उदयनगर येथे सोमवारपासून अखंड हरिनाम सप्ताह रंगणार

भक्ती, परंपरा आणि सामाजिक एकतेचा दिव्य संगम

 

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील उदयनगर (डांगर बु.) येथे दि. ९ ते १६ फेब्रुवारी दरम्यान अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. गेल्या पंचवीस वर्षांपासून अखंडपणे सुरू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह यंदा रौप्य महोत्सवाच्या मंगलमय पर्वात प्रवेश करत आहे. यात विविध धार्मिक, आध्यात्मिक, सांस्कृतिक व सामाजिक उपक्रमांनी नटलेला हा सप्ताह संपूर्ण परिसरात भक्ती, श्रद्धा, परंपरा आणि सामाजिक एकतेचा अद्वितीय संगम घडवणार आहे.

या पवित्र सप्ताहाचे प्रेरणास्थान स्वर्गीय उदयबापू वाघ आहेत. गेल्या पंचवीस वर्षांत या कार्यक्रमाने गावाच्या सामाजिक, धार्मिक व सांस्कृतिक जीवनाला नवी दिशा दिली असून उदयनगर हे परिसरातील एक महत्त्वाचे अध्यात्मिक केंद्र म्हणून ओळख निर्माण करू लागले आहे. रौप्य महोत्सवाचा उद्घाटन सोहळा दि. ९ फेब्रुवारी रोजी सकाळी पार पडणार आहे. या उद्घाटनप्रसंगी खासदार स्मिताताई उदयजी वाघ यांच्या हस्ते दीपप्रज्वलन होईल. दुष्यांत वाघ यांच्या हस्ते कलशपूजन होईल. सरपंच प्रकाश रंगराव वाघ यांच्या हस्ते विना पूजन होणार आहे. कार्यक्रमास विविध क्षेत्रांतील मान्यवर, संत-महंत, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय प्रतिनिधी तसेच भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

 

दैनंदिन धार्मिक कार्यक्रम

 

या अखंड हरिनाम सप्ताहात दररोज पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, त्यामुळे संपूर्ण गावात सतत नामस्मरणाचा गजर ऐकू येणार आहे. काकडा आरती: पहाटे ५.०० ते ६.००, भागवत कथा: सकाळी ८.०० ते ११.००, हरिपाठ: सायंकाळी ५.०० ते ६.००, हरिकीर्तन: रात्री ९.०० ते ११.०० या माध्यमातून गावातील लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्वच भाविक अध्यात्मिक अनुभूती घेत आहेत.

 

नामवंत कीर्तनकारांची पर्वणी

 

या रौप्य महोत्सवाचे विशेष आकर्षण म्हणजे राज्यातील नामवंत व अनुभवी कीर्तनकारांची कीर्तन सेवा. या कीर्तनांमुळे भक्तीबरोबरच प्रबोधन, समाजजागृती आणि जीवनमूल्यांची शिकवण मिळणार आहे. यात  दि. ९ रोजी  ह.भ.प. चेतन महाराज, मालेगाव. दि. १० रोजी ह.भ.प. भगवान महाराज (मानकरी-प्रकाश वसंतराव पाटील),दि. ११ रोजी  ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज (मानकरी- प्रकाश महादू पाटील), दि. १२ रोजी ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज (मानकरी- रोहिदास तुकाराम पाटील), दि. १३ रोजी  ह.भ.प. रविकिरण महाराज (मानकरी-आई तुळजाभवानी मित्रमंडळ, बाप्पा गल्ली), दि. १४ रोजी ह.भ.प. गजानन महाराज (मानकरी- सुभाष नामू पाटील), दि. १५ रोजी ह.भ.प. विश्वनाथ महाराज (मानकरी- परशुराम आत्मराम पाटील), दि. १६ रोजी /काल्याचे कीर्तन- ह.भ.प. आदिनाथ महाराज (मानकरी-किशोर भिकनराव वाघ) यांचे होईल.

पालखी सोहळा रौप्य महोत्सवाचे आणखी एक प्रमुख आकर्षण म्हणजे दि. १५ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ ते ६ वाजेपर्यंत आयोजित भव्य पालखी सोहळा होणार आहे. या सोहळ्यात गावातील व परिसरातील हजारो भाविक सहभागी होणार असून टाळ-मृदंगांच्या गजरात, हरिनामाच्या घोषात संपूर्ण परिसर भक्तीमय होणार आहे. तर दि. १६ रोजी भव्य महाप्रसाद व भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले असून सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत सर्व भाविकांसाठी भोजन खुले राहणार आहे.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *