
नगाव गडखांब येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीराचा शेकडो नागरिकांना शासकीय सेवांचा लाभ
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील नगाव गडखांब येथे शनिवारी ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर’ उत्साहात पार पडले. शिबीरात शेकडो नागरिकांना शासकीय सेवांचा लाभ देण्यात आला.
शिबिराचे उद्घाटन तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांच्या हस्ते करण्यात आले. गावपातळीवर नागरिकांना विविध शासकीय सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिबिरामध्ये विविध योजनांअंतर्गत लाभार्थ्यांना तात्काळ सेवा देण्यात आल्या. यात १३७ लाभार्थ्यांना नवीन व दुबार शिधापत्रिका वितरित करण्यात आल्या. तसेच निराधार योजनेतील ९९ लाभार्थ्यांची थेट लाभ हस्तांतरण प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. याशिवाय २३५ हयात प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली असून ४२ नवीन अर्ज स्वीकारण्यात आले.
महसूल विभागाच्या माध्यमातून ३१ सातबारा दुरुस्त्या व २२ फेरफार नोंदी करण्यात आल्या. तसेच ७२० शेतकऱ्यांना सातबारा उतारे देण्यात आले. सेतू शाखेतर्फे नागरिकांना विविध दाखलेही देण्यात आले. त्यामध्ये ३१८ उत्पन्नाचे दाखले, १३५ रहिवासी दाखले, ४९ जातीचे दाखले आणि १३ नॉन क्रीमिलियर दाखले वितरित करण्यात आले.
शिबिराच्या ठिकाणी विविध प्रशासकीय विभागांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचावी यासाठी माहितीपर प्रदर्शनीय टेबल लावण्यात आले होते. या माध्यमातून नागरिकांना शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली. तसेच आवश्यक मार्गदर्शन करण्यात आले. या शिबिरामुळे शासकीय सेवा थेट गावपातळीवर उपलब्ध झाल्याने नागरिकांची गैरसोय टळली आणि अनेक प्रलंबित कामे जागीच पूर्ण झाली. या शिबिराला महसूल विभागाचे अधिकारी, कर्मचारी तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांनी शिबिराचे प्रास्ताविक करत महसूल विभागाच्या योजनांची माहिती दिली. निवासी नायब तहसीलदार सी. यु. पाटील यांनी आभार मानले.

Leave a Reply