देवळी येथे जातीवाचक शिवीगाळ करून चाकूने हल्ला; ॲट्रॉसिटीसह विविध कलमांखाली गुन्हा दाखल

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील देवळी येथील आर. बी. कन्स्ट्रक्शनच्या कामाच्या ठिकाणी एका युवकाला जातीवाचक शिवीगाळ करून चाकूने जखमी केल्याचा तसेच त्याच्या खिशातील रोख रक्कम हिसकावल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी अमळनेर पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता आणि अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियमांतर्गत विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, फिर्यादी चैतन्य राजेंद्र संदानशिव यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, मंगळवार, २२ जुलै रोजी सकाळी सुमारे ११ वाजता आरोपी अनंत निकम हा देवळी येथील आर. बी. कन्स्ट्रक्शनच्या कामाच्या ठिकाणी आला. त्याने जातीवाचक शिवीगाळ करत चाकूने डाव्या छातीजवळ व पोटाच्या भागात वार केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या हल्ल्यात चैतन्य राजेंद्र संदानशिव हे गंभीर जखमी झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. तक्रारीनुसार, हल्ल्यानंतर आरोपीने फिर्यादीच्या खिशातील १ हजार रुपये बळजबरीने काढून घेतले. तसेच दुसऱ्या खिशातील ४० हजार रुपये काढण्याचाही प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे. जखमी चैतन्य राजेंद्र संदानशिव यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी अमळनेर पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम १०९, ३०९(६), ११५(२), ३५१(२) आणि ३५२ तसेच अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम कलम ३(१)(र), ३(१)(स) आणि ३(२)(व्हीए)-२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी विनायक कोते करीत आहेत.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *