अमळनेरात २५ जुलैला ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर

अमळनेर (प्रतिनिधी) राज्य शासनाच्या गतिमान प्रशासन व लोकाभिमुख सेवा उपक्रमांतर्गत ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ अभियानाचे आयोजन अमळनेर येथे  दि. २५ जुलै रोजी करण्यात आले आहे. सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत इंदिरा भवन, अमळनेर येथे होणाऱ्या या शिबिरात महसूल विभागासह विविध शासकीय विभागांच्या योजनांचा लाभ नागरिकांना एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिला जाणार आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शासकीय योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

महसूल व वन विभाग मंत्रालयाच्या ९ जुलै व १३ जुलै रोजीच्या शासन निर्णयानुसार राज्यभर तालुका स्तरावर या विशेष समाधान शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला, विद्यार्थी आणि विविध घटकांच्या शासकीय अडचणींचे तातडीने निराकरण करणे, तक्रारींचा जलद निपटारा करणे तसेच प्रशासन अधिक लोकाभिमुख आणि कार्यक्षम बनविणे हा या अभियानाचा प्रमुख उद्देश आहे. या शिबिरात महिलांना शेतकरी दर्जाचे प्रमाणपत्र, स्वामित्व योजनेअंतर्गत गावठाणातील नागरिकांना सनद वितरण, मुख्यमंत्री बळीराजा शेत-पाणंद रस्ता योजनेच्या प्रशासकीय मान्यता, १ जानेवारी २०११ पूर्वीच्या शासकीय जमिनीवरील निवासी अतिक्रमणे नियमित करण्यासाठी अर्ज स्वीकारणे, ‘जिवंत सातबारा’ मोहिमेत वारस नोंदणी, राजमाता जिजाऊ महिला सक्षमीकरण योजना, घरकुल योजना, कौटुंबिक वाटणीपत्रावरील नोंदणी शुल्क माफी, अनाथ व वंचित घटकांसाठी विशेष सेवा तसेच सेवा हमी कायद्यांतर्गत विविध सेवांचा लाभ दिला जाणार आहे. याशिवाय प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत निधी वितरण व बांधकाम परवानगी, मालमत्ता हस्तांतरण, महात्मा फुले जनआरोग्य योजना, महिला बचत गटांना अर्थसहाय्य, वाढीव आवास अनुदान, वीज जोडणी, अंगणवाड्यांना गॅस जोडणी, जलतारा मंजुरी आदेश, गोठा शेड मंजुरी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना, जननी सुरक्षा योजना, प्रधानमंत्री जनआरोग्य योजना तसेच महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेसह विविध योजनांचा लाभ नागरिकांना मिळणार आहे. महावितरणच्या माध्यमातून स्मार्ट योजना, सौर छत योजना आणि ‘मागेल त्याला सौर कृषी पंप’ योजनेसाठी अर्ज स्वीकारले जाणार आहेत. कृषी विभागामार्फत एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान, फळबाग, ठिबक सिंचन आणि कृषी यांत्रिकीकरण योजनांची माहिती व लाभ दिले जातील. वन विभागामार्फत वन्यप्राणी नुकसानभरपाई, पशुसंवर्धन विभागाच्या विविध योजना, पुरवठा विभागाच्या प्राधान्य कुटुंब योजना तसेच संजय गांधी, श्रावणबाळ आणि इंदिरा गांधी निराधार योजनांच्या मंजुरीपत्रांचे वितरणही करण्यात येणार आहे. या शिबिराचे आणखी एक विशेष आकर्षण म्हणजे अमळनेर पोलिस ठाण्याच्या वतीने शोधून काढण्यात आलेले गहाळ मोबाईल त्यांच्या मूळ मालकांना परत करण्यात येणार आहेत. तालुक्यातील नागरिक, शेतकरी, लोकप्रतिनिधी तसेच विविध सामाजिक संघटनांनी या विशेष समाधान शिबिरात मोठ्या संख्येने सहभागी होऊन विविध शासकीय योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांनी केले आहे.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *