
‘एक गाव एक मिरवणूक’ संकल्पनेतून सामाजिक एकतेचा जागर
अमळनेरमध्ये संत शिरोमणी श्री रविदास महाराज जयंती जल्लोषात साजरी
अमळनेर (प्रतिनिधी) संत शिरोमणी श्री रविदास महाराज यांच्या ६४९व्या जयंतीनिमित्त अमळनेर शहर व तालुक्यातील समस्त चर्मकार समाज बांधवांनी अभूतपूर्व एकजूट दाखवत ‘एक गाव एक मिरवणूक’ ही आदर्श संकल्पना प्रथमच यशस्वीपणे राबवली. यापूर्वी विविध भागांतून वेगवेगळ्या मिरवणुका निघत असताना, यंदा संपूर्ण समाज एका ध्वजाखाली एकत्र येत सामाजिक सलोखा व ऐक्याचे प्रभावी दर्शन घडले.
शहरातील मरिमाता मंदिराजवळील संत शिरोमणी श्री रविदास महाराज यांच्या मंदिरापासून शोभायात्रेस प्रारंभ झाला. प्रारंभी समाजातील ज्येष्ठ बांधवांच्या हस्ते महाराजांचे विधीवत पूजन करण्यात आले. त्यानंतर समाजातील माता-भगिनींनी पूजन करून भक्तिभाव व्यक्त केला. उपस्थितांना प्रसाद वाटप झाल्यानंतर “संत शिरोमणी श्री रविदास महाराज की जय” च्या गजरात शोभायात्रा मार्गस्थ झाली. ही शोभायात्रा माळीवाडा, भोईवाडा, कसाली मोहल्ला, वाडी चौक, सराफ बाजार, दगडी दरवाजा, मोठा बाजार, राणी लक्ष्मीबाई चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक मार्गे गांधलीपुरा येथे पोहोचली. तेथील संत शिरोमणी श्री रविदास महाराज यांच्या मंदिरात पुन्हा पूजन करण्यात आले. शोभायात्रेत सहभागी सर्व भाविकांनी दर्शन व पूजनाचा लाभ घेतला. दरम्यान, मिरवणूक मार्गावरील सर्व देवस्थाने तसेच महापुरुषांच्या प्रतिमा व पुतळ्यांना माल्यार्पण व पूजन करण्यात आले. गांधलीपुरा येथून शोभायात्रा पुन्हा मरिमाता मंदिराजवळील महाराजांच्या मंदिरात आल्यानंतर मिरवणुकीची सांगता झाली.
नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर, गटनेते पंकज चौधरी, नगरसेवक दीपक चौगुले यांनी सराफ बाजारात शोभायात्रेत सहभागी होत महाराजांच्या पालखीचे व प्रतिमेचे पूजन केले. बँड पथकाद्वारे केवळ धार्मिक गीते, संत शिरोमणी श्री रविदास महाराजांचे दोहे व महापुरुषांच्या जीवनावर आधारित गीते सादर करण्यात आली. कोणत्याही प्रकारचे अशोभनीय गीते किंवा नृत्य कटाक्षाने टाळण्यात आले, यामुळे मिरवणुकीला आध्यात्मिक व शिस्तबद्ध स्वरूप प्राप्त झाले.
बहुतांश समाजबांधव पांढऱ्या वेशभूषेत व टोपी परिधान करून सहभागी झाले होते. संपूर्ण मिरवणूक अत्यंत शिस्तबद्ध वातावरणात पार पडली. ठिकठिकाणी पुष्पवृष्टी करून शोभायात्रेचे स्वागत करण्यात आले. विशेष म्हणजे, मिरवणुकीत मोठ्या संख्येने महिला सहभागी झाल्या असून त्यांच्या लक्षणीय उपस्थितीने सर्वांचे लक्ष वेधले. ‘एक गाव एक मिरवणूक’ या उपक्रमातून सामाजिक एकतेचा व संस्कारांचा आदर्श वस्तुपाठ अमळनेरने दिला, अशी भावना उपस्थितांमध्ये व्यक्त होत होती.

Leave a Reply