
अमळनेरात गौसन्मान रॅली उत्साहात; ‘गौमाता राष्ट्रमाता’ घोषित करण्याची मागणी
अमळनेर (प्रतिनिधी) गौमातेचा सन्मान वाढवण्यासाठी ‘गौसन्मान आवाहन अभियान’ अंतर्गत सोमवारी (दि. २७ एप्रिल) अमळनेर शहरात भव्य गौसन्मान रॅली उत्साहात पार पडली. या रॅलीत हिंदू समाजातील साधू-संतांसह शेकडो गोसेवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
गौमाता राष्ट्रमाता घोषित करावी या प्रमुख मागणीसाठी हजारो गोसेवकांच्या सह्या असलेले निवेदन प्रशासनामार्फत भारताचे पंतप्रधान, राष्ट्रपती तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व राज्यपाल यांना पाठविण्यात आले. गौसन्मान आवाहन अभियानतर्फे आयोजित या रॅलीला सकल हिंदू समाजाचा मोठा प्रतिसाद लाभला. भजनी मंडळ व महिला मंडळानेही उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. सकाळी १० वाजता प्रताप मिल कंपाउंड येथील संकटमोचन हनुमान मंदिरातून रॅलीला सुरुवात झाली. शहरातील प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करत रॅली तहसील कार्यालयात पोहोचली. यावेळी साधू-संतांनी मनोगत व्यक्त करत गौमातेचे धार्मिक व सांस्कृतिक महत्त्व अधोरेखित केले. त्यानंतर तहसीलदारांना हजारो सह्यांचे निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात देशभर गोहत्या बंदीसाठी एकच कडक कायदा लागू करावा, ‘केंद्रीय गोसेवा व संरक्षण कायदा’ लागू करावा, सर्व कत्तलखान्यांचे परवाने रद्द करावेत तसेच स्वतंत्र केंद्रीय गौ मंत्रालय स्थापन करावे, अशा विविध मागण्या करण्यात आल्या. गौमातेबद्दल श्रद्धा असलेल्या हिंदू बांधव-भगिनींनी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित राहून रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

Leave a Reply