
अमळनेर शहरासह तालुक्यात ठिकठिकाणी आगींचा कहर; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान, अग्निशमन दलाचे तत्पर कार्य
अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर शहरातील पैलाड भागात शेतांमध्ये तसेच तालुक्यातील गलवाडे, रंजाणे व जळोद, जुनवणे, रामेश्वर परिसरात गेल्या दोन दिवसांत लागलेल्या आगींमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र अग्निशमन दलाच्या वेळीच केलेल्या प्रयत्नांमुळे काही ठिकाणी मोठा अनर्थ टळला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, अमळनेर शहरातील गट नम्बर ६७५/२ मध्ये पैलाड येथील प्रवीण बाबुराव पाटील यांच्या शेतात मका काढून पडला होता. तसेच त्यांच्या शेजारील शेतात समाधान खंडू पाटील व रवींद्र कहारू पाटील यांच्याही शेतात मका काढून पडला होता. २४ रोजी दुपारी चार वाजता शेतातील विजेच्या तारांमध्ये शॉर्ट सर्किट होऊन प्रवीण पाटील यांच्या ५ बिघे शेतातील ३ लाख रुपये किमतीचा मका व ठिबक नळ्या , तसेच समाधान खंडू पाटील यांच्याही शेतातील ५ बिघे मका व ठिबक नळ्या असा ३ लाख रुपये किमतीचा माल , आणि रवींद्र कहारू पाटील यांच्या शेतातील २ लाख ८० हजार रुपये किमतीचा चार बिघे मका आणि ठिबक नळ्या असे एकूण ८ लक्ष ८० हजार रुपये किमतीचा माल संपूर्ण जाळून खाक झाला.
दि. २६ रोजी दुपारी ३ ते ४ वाजेदरम्यान गलवाडे शिवारातील गट क्रमांक ३१७ मधील संजय हरचंद पाटील यांच्या शेतात अचानक आग लागली. याची माहिती भगवान पाटील यांनी दिल्यानंतर गावकऱ्यांनी तातडीने धाव घेत आग विझवण्याचा प्रयत्न केला. या आगीत सुमारे ६० ते ७० क्विंटल मका तसेच ४० गुंठा क्षेत्रातील ठिबक सिंचनाच्या नळ्या व अन्य साहित्य जळून खाक झाले. या प्रकरणी मारवड पोलीस ठाण्यात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली असून हेडकॉन्स्टेबल मुकेश साळुंखे तपास करीत आहेत. याच दिवशी जळोद येथे रऊफ खाटीक यांच्या शेतातही आग लागली. या आगीत काही झाडांचे नुकसान झाले, मात्र अग्निशमन दल वेळेत दाखल झाल्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. दरम्यान, दि. २७ रोजी मालपूर येथील एका शेतकऱ्याने बांधावरील कचरा व पाला-पाचोळा जाळल्याने आग शेजारील रंजाणे शिवारात पसरली. संबंधित शेतात गहू काढलेला असला तरी काड्यांमुळे आग वाढली व काही ठिबक नळ्यांचे नुकसान झाले. मुख्याधिकारी गणेश शिंदे यांना माहिती मिळताच अग्निशमन बंब तातडीने मागवण्यात आला. गणेश गोसावी, जफर पठाण, दिनेश बिऱ्हाडे, आकाश संदानशिव आदींनी अथक प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. अन्यथा ही आग शेजारच्या ५ ते ६ बिघे मक्याच्या शेतात पसरून मोठे नुकसान झाले असते.
तर तालुक्यातील जुनवणे येथील प्रवीण प्रल्हाद महाले यांच्या शेत गट नम्बर १६८/२ व प्रभाकर यशवंत पाटील यांचे शेत गट नम्बर १६९/२ मध्ये २३ रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास विद्युत पोल च्या तारांमध्ये शॉर्ट सर्किट झाल्याने दोघांच्या शेतातली ज्वारी पिके ,कणसे ठिबक नळ्या असे एकूण ८५ हजार रुपयांचे साहित्य जळून खाक झाले. अमळनेर पोलीस स्टेशनला अकस्मात आगीची नोंद करण्यात आली असून तपास हेडकॉन्स्टेबल विजय भोई करीत आहेत. त्याचप्रमाणे तालुक्यातील रामेश्वर येथील राहुल राजाराम वंजारी यांच्या कुऱ्हे येथील गट नम्बर १३४ (३) मधील शेतात २४ रोजी सायंकाळी साडे पाच वाजेच्या सुमारास आग लागून तीन लाख रुपयांचा मका आणि ठिबक नळ्या जळून खाक झाले आहे. सध्या तापमान ४४ अंशांवर पोहोचले असताना कडक उन्हात आणि आगीच्या प्रखर उष्णतेतही अग्निशमन दल सतत तत्परतेने कार्य करत असल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Leave a Reply