विविध योजनांची माहिती ग्राहकांना द्या; सेवा संकल्प अभियानात जास्तीत जास्त सहभाग घडवा : आमदार अनिलदादा पाटील

अमळनेर (प्रतिनिधी) सेवा संकल्प अभियानाच्या निमित्ताने अमळनेर तालुक्यातील ग्राहकांना महावितरणच्या विविध योजनांची माहिती देऊन त्यांचा जास्तीत जास्त लाभ मिळवून देण्याच्या दृष्टीने आमदार अनिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महावितरणच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत प्रधानमंत्री सूर्यघर योजना, स्वयंपूर्ण महाराष्ट्र रूफटॉप सोलर योजना (स्मार्ट) आणि मागेल त्याला सौर कृषी पंप योजना यांची माहिती ग्राहकांपर्यंत पोहोचविण्याचे निर्देश आमदार अनिल पाटील यांनी दिले.

या बैठकीस महावितरणचे कार्यकारी अभियंता (धरणगाव विभाग) सोनगिरे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता (अमळनेर शहर) ज्ञानेश्वर अंबाडकर, उपकार्यकारी अभियंता देवेंद्र वाणी (धरणगाव विभाग), उपकार्यकारी अभियंता (अमळनेर ग्रामीण) भावसार आदी अधिकारी उपस्थित होते.  या बैठकीत सेवा संकल्प अभियानाच्या निमित्ताने महावितरणच्या विविध योजनांची माहिती ग्राहकांना देण्याचे आदेश आमदार अनिल पाटील यांनी दिले. यामध्ये प्रधानमंत्री सूर्यघर योजना, स्वयंपूर्ण महाराष्ट्र रूफटॉप सोलर योजना (स्मार्ट) आणि मागेल त्याला सौर कृषी पंप योजना यांचा समावेश आहे. तहसील कार्यालय, अमळनेर येथे दि. १७ ऑक्टोबरपर्यंत हे अभियान राबविण्यात येणार असून, अमळनेर तालुक्यातील जास्तीत जास्त ग्राहकांनी या अभियानात सहभाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.

प्रधानमंत्री सूर्यघर योजना : ३ किलोवॅटपर्यंत सोलर बसविणाऱ्या ग्राहकांना अंदाजे ७८ हजार रुपये अनुदान मिळणार असून, यामुळे ग्राहकांचे वीज बिल पुढील २५ वर्षांसाठी शून्य होणार आहे. स्वयंपूर्ण महाराष्ट्र रूफटॉप सोलर योजना : मागील वर्षभरात १०० युनिटपेक्षा कमी वीज वापर असणाऱ्या ग्राहकांना महावितरणतर्फे कमी दरात सोलर बसवून दिले जाणार आहे. १ किलोवॅट इंस्टॉलेशनसाठी ओपन व ओबीसी प्रवर्गातील ग्राहकांसाठी अंदाजे १० हजार रुपये, एससी व एसटी प्रवर्गासाठी अंदाजे ५ हजार रुपये, तर बीपीएल ग्राहकांसाठी केवळ २ हजार ५०० रुपये खर्च येणार आहे. प्रत्यक्ष किंमत अंदाजे ६० हजार ते ७० हजार रुपये असून, उर्वरित रक्कम केंद्र व राज्य शासनाचे अनुदान म्हणून वर्ग केली जाईल.

मागेल त्याला सौर कृषी पंप योजना : शेतकऱ्यांना सिंचनासाठी स्वतंत्र व शाश्वत सौर कृषी पंप उपलब्ध करून देण्यासाठी ही योजना आहे. सर्वसाधारण गटातील शेतकऱ्यांना केवळ १० टक्के, तर अनुसूचित जाती-जमातीच्या शेतकऱ्यांना केवळ ५ टक्के रक्कम भरून पूर्ण सौर पंप संच मिळणार असून, उर्वरित रक्कम केंद्र व राज्य शासनाचे अनुदान असेल. जमिनीच्या क्षेत्रानुसार ३ ते ७.५ एचपी क्षमतेचे पंप उपलब्ध असून, ५ वर्षांची दुरुस्ती हमी व इन्शुरन्ससह सुविधा मिळणार आहे. तसेच वीजबिल व लोडशेडिंगची चिंता राहणार नाही.

इच्छुक ग्राहकांनी तहसील कार्यालयातील महावितरणच्या सेवा सेतू स्टॉलवर किंवा नजीकच्या महावितरण कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन आमदार अनिल पाटील यांनी अमळनेर तालुक्यातील सर्व नागरिकांना केले आहे.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *