शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आमदार अनिल दादा पाटील यांचा लढा अखेर यशस्वी; अमळनेरचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश

अमळनेर (प्रतिनिधी) यंदा पावसाने दडी मारल्याने हवालदिल झालेल्या अमळनेर मतदारसंघातील शेतकरी बांधवांच्या हक्कासाठी आमदार अनिलदादा पाटील यांनी केलेला सातत्यपूर्ण लढा अखेर यशस्वी झाला असून, महाराष्ट्र शासनाकडून अमळनेर मतदारसंघाचा दुष्काळग्रस्तांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे खरीप हंगामात मोठे नुकसान झालेल्या पीडित शेतकरी बांधवांना शासकीय मदतीचा हात मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

याबाबत मदत व पुनर्वसन विभागाचा शासन आदेश २५ सप्टेंबर रोजी जाहीर झाला असून, यात दुष्काळग्रस्तांच्या यादीत अमळनेर मतदारसंघाचा समावेश झाला आहे. २०२६ च्या खरीप हंगामातील मोठ्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना मदत व विविध सवलतींचा मार्ग उपलब्ध होणार असल्याने आमदार अनिलदादा पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, जलसंपदामंत्री गिरीश महाजन व महायुती सरकारचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले आहेत.

 

दुष्काळग्रस्त भागाचा दौरा करून केली प्रत्यक्ष पाहणी

 

दुष्काळग्रस्त शेतकरी बांधवांना आधार देण्यासाठी आमदार अनिल पाटील यांनी सतत आपला लढा सुरू ठेवला होता. कालच आमदार अनिल पाटील यांनी शासकीय अधिकारी वर्गाला सोबत घेत दुष्काळग्रस्त भागाचा दौरा केला. यावेळी प्रत्यक्ष पाहणी करून शेतकरी बांधवांच्या अडचणी आणि पिकांच्या परिस्थितीची माहिती घेतली. महसूल प्रशासनाला तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश देत पंचनाम्यांची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करून पुढील आवश्यक कार्यवाहीसाठी अहवाल शासनाकडे सादर करण्याच्या सूचना आमदार अनिल पाटील यांनी दिल्या. दुष्काळाच्या परिस्थितीबाबत शासन संवेदनशील असून, संकटाच्या काळात सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील, अशी ग्वाही त्यांनी शेतकरी बांधवांना दिली. अमळनेर विधानसभा मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी म्हणून शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत मिळवून देण्यासाठी तसेच अमळनेर मतदारसंघात दुष्काळ जाहीर करण्यासाठी शासनदरबारी सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवू, असा ठाम विश्वासही त्यांनी व्यक्त केला होता.

यावेळी प्रांताधिकारी मयूर भंगाळे, तहसीलदार उमा ढेकळे, कृषी अधिकारी, मंडळाधिकारी, तलाठी तसेच महसूल प्रशासनातील विविध अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. तसेच महायुती व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि लोकप्रतिनिधी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शेतकरी बांधवांच्या प्रश्नांसाठी सक्रिय सहभाग नोंदवला.

 

नाशिक येथील बैठकीतही उठविला दुष्काळाचा आवाज

 

याच पार्श्वभूमीवर दोन दिवसांपूर्वी नाशिक येथे कृषी मंत्र्यांच्या उपस्थितीत विभागीय आढावा बैठक झाली होती. या बैठकीतही आमदार अनिल पाटील यांनी पावसाअभावी मतदारसंघाची संपूर्ण परिस्थिती मांडून शेतकरी बांधवांना मदतीचा हात देण्यासाठी दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली. यावेळी त्यांनी सर्व तांत्रिक मुद्दे पटवून देत काही निकष बाजूला ठेवून शेतकरी बांधवांना न्याय देण्याची मागणी केली होती.

 

दीड महिन्यापूर्वीच मुख्यमंत्र्यांसह वरिष्ठ मंत्र्यांना निवेदन

 

अमळनेर विधानसभा मतदारसंघातील अमळनेर व पारोळा तालुक्यांमध्ये दीड महिन्यापूर्वीच पावसाने दडी मारल्याने खरीप हंगामातील पिके करपू लागली होती. पावसाअभावी पिकांची वाढ खुंटली असून, शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची भीती निर्माण झाली होती. बळीराजा मोठ्या संकटात सापडला असताना या गंभीर परिस्थितीची तातडीने शासनाने दखल घेऊन शेतकऱ्यांना मदत तथा दिलासा द्यावा, यासाठी आमदार अनिल पाटील यांनी शासनातील वरिष्ठ मंत्र्यांची भेट घेऊन निवेदने सादर केली होती. यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्राताई अजितदादा पवार, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांना दुष्काळ जाहीर करण्यासंदर्भात निवेदन देऊन अमळनेर व पारोळा तालुक्यांतील सद्यस्थितीची माहिती आमदार अनिल पाटील यांनी दिली होती. सातत्याने केलेल्या या पाठपुराव्यानंतर अखेर अमळनेर मतदारसंघाचा दुष्काळग्रस्तांच्या यादीत समावेश झाला असून, शेतकरी बांधवांना शासनाकडून मदत व विविध सवलती मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *