गलवाडे रोडवरील बियर शॉपी फोडून ३० हजारांचा ऐवज लंपास

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील गलवाडे रोडवरील बियर व वाईन शॉपी फोडून अज्ञात चोरट्यांनी रोख रकमेसह बियरचे कॅन व सीसीटीव्ही डीव्हीआर हार्डडिस्क असा सुमारे ३० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना २० रोजी रात्री गलवाडे शिवारात घडली. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, राकेश भगवान पाटील (रा. गलवाडे) या माजी सैनिकाचे गलवाडे रस्त्यावर केशरी बियर व वाईन शॉपी आहे. २० रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास त्यांनी आपले दुकान बंद केले होते. २१ रोजी सकाळी साडेदहा वाजता ते दुकान उघडण्यासाठी आले असता दुकानाच्या शटरचे कुलूप तुटलेले दिसून आले. त्यांनी दुकान उघडून पाहणी केली असता काउंटरचे कुलूप तोडून त्यातील १२ हजार ५०० रुपयांची रोख रक्कम चोरून नेल्याचे आढळले. तसेच दुकानातील बियरचे ७२ कॅन व सीसीटीव्ही डीव्हीआर हार्डडिस्कही चोरट्यांनी लंपास केली. याप्रकरणी मारवड पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास हेकॉ संजय सूर्यवंशी करीत आहेत.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *