
डॉ. सुनिकेश खैरनार सुपर स्पेशालिटी नीट परीक्षेत अखिल भारतीय अठरावा क्रमांक
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील हेडावे येथील डॉ. सुनिकेश नितल खैरनार यांनी ‘सुपर स्पेशालिटी नीट’ (एनईईटी एसएस) या अत्यंत कठीण समजल्या जाणाऱ्या परीक्षेत दैदिप्यमान यश संपादन करत अखिल भारतीय पातळीवर अठरावा क्रमांक पटकावला आहे. त्यांच्या या यशामुळे उत्तराखंडमधील ऋषिकेश येथील प्रतिष्ठित एआयआयएमएल ऋषिकेश येथे डीएम (कॅन्सर तज्ज्ञ – ऑन्कोलॉजी) या उच्च पदवी अभ्यासक्रमासाठी त्यांचा प्रवेश निश्चित झाला आहे.
डॉ. सुनिकेश यांचा जन्म अमळनेर तालुक्यातील हेडावे येथील मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांचे वडील भारतीय डाक विभागात कार्यरत असून आई सुलोचना खैरनार या गृहिणी आहेत. काका पारोळा येथे प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत आहेत, तर लहान काका कार्यक्रम व्यवस्थापन क्षेत्रात व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्य करीत आहेत. घरात वैद्यकीय शिक्षणाची कोणतीही पार्श्वभूमी नसतानाही डॉ. सुनिकेश यांनी लहानपणापासूनच आपल्या कुशाग्र बुद्धिमत्तेची झलक दाखवली. त्यांनी नायर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मुंबई येथून एमबीबीएस पदवी संपादन केली. त्यानंतर सायन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मुंबई येथून एमडी ही पदव्युत्तर पदवी नुकतीच पूर्ण केली. यानंतर सुपर स्पेशालिटी नीट (एनईईटी एसएस) परीक्षेत उज्ज्वल यश मिळवत त्यांनी संपूर्ण भारतातून अठरावा क्रमांक मिळवला आणि खैरनार कुटुंबासह अमळनेर परिसराचा नावलौकिक वाढवला. या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. डॉ. सुनिकेश यांचे सासर शिंदखेडा तालुक्यातील कुरुकवाडे येथे असून सासरे डॉ. संजय पाटील हे मारवड महाविद्यालयात प्राध्यापक आहेत. अमळनेर तालुका मराठा समाज मंडळाचे अध्यक्ष जयवंतराव पाटील तसेच संपूर्ण मराठा समाजाकडून त्यांचे कौतुक करण्यात आले आहे.

Leave a Reply