पारदर्शी कारभारासाठी पालिकेतील सर्व सभांचे लाईव्ह प्रक्षेपण करण्याची मागणी

नगरसेवकांनी नगराध्यक्ष, मुख्याधिकाऱ्यांना दिले निवेदन

 

अमळनेर (प्रतिनिधी) पारदर्शी कारभारासाठी पालिकेच्या सर्व सभांच्या कामकाजाचे व्हिडिओ शूटिंग व्हावे, बाहेर कर्मचारी व नागरिकांसाठी स्क्रीन लावला जावा, केबल टीव्हीच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण व्हावे व पत्रकारांना सभागृहात स्थान मिळावे, अशी  मागणी नगरसेवक-नगरसेविकांनी निवेदनाद्वारे केली आहे.

पालिकेची सभा मंगळवार, दि. 24 फेब्रुवारी रोजी होत आहे. या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर व मुख्याधिकारी गणेश शिंदे यांना सोमवार, दि. 23 फेब्रुवारी रोजी सायंकाळी निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनात म्हटले आहे, की पालिकेच्या विविध सभांच्या कामकाजांबाबत सर्वसामान्य नागरिकांना खूप उत्सुकता व आकर्षण आहे. आपली लोकाभिमुखता व पारदर्शकता प्रतीत होण्यासाठी आपण आपल्या विविध सभांच्या कामकाजाचे व्हिडिओ शूटिंग करून तो डाटा सेव्ह ठेवावा. पालिकेबाहेर मोठा स्क्रीन लावून कर्मचारी व नागरिकांना त्याचे थेट प्रक्षेपण दिसेल अशी व्यवस्था करावी. तसेच केबल टीव्हीच्या माध्यमातून संपूर्ण शहरातही थेट प्रक्षेपण दिसावे. जेणेकरून आपण नागरिकांच्या हिताचे काय निर्णय करीत आहोत? काय चर्चा करीत आहोत ? हे सारे दृश्यस्वरूपात सर्वांना दिसेल. तसेच शहरात पत्रकारांची संख्या जास्त आहे. त्यामुळे सर्वांनाच सभागृहात बातमी कव्हर करण्यासाठी प्रवेश देणे शक्य नाही, हे आम्ही जाणून आहोत. त्यामुळे पत्रकारांच्या प्रत्येक संघटनेच्या किमान दोन सदस्यांना सर्व सभांच्या बातम्या कव्हर करण्यासाठी सभागृहात सन्मानपूर्वक परवानगी देण्यात यावी. पत्रकारांची ही संख्या जास्तीत जास्त सहा ते आठ असेल. इतक्या पत्रकारांना आपण सभागृहात सहज स्थान देऊ शकतो. कृपया आमच्या या विनंतीला सकारात्मक प्रतिसाद देऊन मंगळवार, दि. 24 फेब्रुवारी 2026 च्या सभेपासूनच यातील जास्तीत जास्त बाबींचा प्रारंभ करावा. टप्प्या-टप्प्याने आमच्या सर्वच मागण्यांसदर्भातील विनंतीप्रमाणे सारे काही सुरू करावे. निवेदनावर  जयश्रीताई अनिल पाटील, डॉ. डिगंबर विठ्ठल महाले, भरतकुमार सुरेश ललवाणी, सचिन विभाकर कासार, देवेंद्र भानुदास कांबळे, प्रवीण  गंगाराम पाटील, नंदा नरेंद्र संदानशिव, स्वप्ना विक्रांत पाटील, जुबेदाबी नसिरोद्दीन,  कविता विजय राजपूत, अफसाना मुक्तार खाटीक, योगिता सयाजीराव कापडणेकर, शोभाबाई भिवसन गढरे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *