
पाडळसरे येथे कानबाई मातेला भावपूर्ण निरोप; तापीच्या त्रिवेणी संगमावर विसर्जन
अमळनेर (प्रतिनिधी) : खान्देशवासीयांचा प्रमुख आणि पारंपरिक सण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कानबाई उत्सवाची पाडळसरे येथे मोठ्या भक्तिभावात सांगता झाली. तीन दिवस चाललेल्या या उत्सवात गावाला जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. विजय गुर्जर, रघुनाथ पाटील, भरत गुर्जर आणि बारकू मिस्तरी यांच्या घरी पारंपरिक पद्धतीने कानबाईची स्थापना करण्यात आली होती.
उत्सवादरम्यान महिला, पुरुष आणि भाविकांनी मोठ्या संख्येने कानबाईचे दर्शन घेतले. रविवारी रात्रभर भजन, गायन आणि जागरणाचा कार्यक्रम झाला. सोमवारी सकाळपासूनच सवाद्य मिरवणूक आणि विसर्जनाची तयारी सुरू झाली. महिलांनी व मुलींनी खान्देशी पारंपरिक वेशभूषेत कानबाईचे पूजन केले.
पुनर्वसन गावातून निघालेली मिरवणूक जुने पाडळसरे गाव, अंबिका माता मंदिर आणि नाटेश्वर महादेव परिसरातून तापी, अनेर व बोरी नदीच्या त्रिवेणी संगमावर पोहोचली. सामूहिक आरतीनंतर भरघोस पीक, शेतकरी व शेतमजुरांच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना करण्यात आली. त्यानंतर “कानबाई माता की जय”च्या जयघोषात तापी नदीत कानबाई मातेला भावपूर्ण निरोप देत विसर्जन करण्यात आले. विसर्जनावेळी अनेक महिला भावविवश झालेल्या दिसून आल्या.

Leave a Reply