
अल्पवयीन मुलगी प्रियकरासोबत पळून गेली; प्रसूतीवेळी वय उघड झाल्याने पतीविरुद्ध पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल
अमळनेर (प्रतिनिधी) प्रेमसंबंधातून अल्पवयीन मुलगी प्रियकरासोबत पळून गेल्यानंतर त्याच्यासोबत राहत असताना गर्भवती झाली. प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल झाल्यानंतर तिचे वय १८ वर्षांपेक्षा कमी असल्याचे समोर आल्याने संबंधित तरुणाविरुद्ध पॉक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची वेळ आल्याची घटना तालुक्यातील चोपडाई कोंढावळ येथे उघडकीस आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, चोपडाई कोंढावळ येथील एका अल्पवयीन विवाहितेला प्रसूतीसाठी धुळे जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. १२ जून रोजी तिने मुलाला जन्म दिला. रुग्णालयातील नोंदणी प्रक्रियेदरम्यान तिची जन्मतारीख तपासण्यात आली असता तिचे वय अवघे १७ वर्षे ५ महिने असल्याचे निदर्शनास आले. याबाबत रुग्णालय प्रशासनाने पोलिसांना माहिती दिल्यानंतर संबंधित महिलेचा जबाब नोंदविण्यात आला. जबाबात तिने ईनेश राजू पावरा याच्यासोबत प्रेमसंबंध असल्याचे सांगितले. २०२५ मध्ये तो तिला पळवून घेऊन गेला आणि विवाह न करताच आपल्या कुटुंबासोबत ठेवून तिच्याशी शारीरिक संबंध ठेवत असल्याचे तिने नमूद केले. या संबंधातून ती गर्भवती राहिली. दिवस भरल्यानंतर तिच्या सासूने तिला प्रसूतीसाठी धुळे जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. प्रसूतीदरम्यान ती अल्पवयीन असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर तिच्या जबाबाच्या आधारे अमळनेर पोलीस ठाण्यात ईनेश राजू पावरा याच्याविरुद्ध बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण (पॉक्सो) कायदा २०१२ च्या कलम ६ तसेच भारतीय न्याय संहिता कलम ६४(एम)(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शरद काकळीस करीत आहेत.

Leave a Reply