
चेतन जाधव यांची उल्लेखनीय कामगिरी; ५००व्या नवीकरण अभ्यासक्रमाच्या परीक्षेत जळगाव जिल्ह्यात प्रथम
हिंदी शिक्षकांच्या अंतिम परीक्षेत ३६ स्पर्धकांवर मात; गडखांब आश्रमशाळेचा व अमळनेर तालुक्याचा गौरव

अमळनेर (प्रतिनिधी) : केंद्रीय हिंदी संस्थान, हैदराबाद केंद्र (शिक्षण मंत्रालय, भारत सरकार) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ५००व्या नवीकरण अभ्यासक्रमाच्या (Refresher Course) अंतिम परीक्षेत कै. खुशालदादा माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा, गडखांब ता. अमळनेर येथील उपशिक्षक चेतन किसन जाधव यांनी जळगाव जिल्ह्यातून प्रथम क्रमांक मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. त्यांच्या या यशामुळे शाळेसह अमळनेर तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
केंद्रीय हिंदी संस्थान, हैदराबाद केंद्रातर्फे १० ऑगस्ट ते २२ ऑगस्ट २०२६ या कालावधीत हिंदी शिक्षकांसाठी विशेष ५००व्या नवीकरण अभ्यासक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षणासाठी महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातून एकूण ३६ हिंदी शिक्षकांनी सहभाग घेतला होता. प्रशिक्षण कालावधीत विविध शैक्षणिक विषयांवर मार्गदर्शन व प्रशिक्षण देण्यात आले. त्यानंतर घेण्यात आलेल्या अंतिम परीक्षेत चेतन किसन जाधव यांनी सर्व ३६ सहभागी शिक्षकांमध्ये प्रथम क्रमांक पटकावत उत्कृष्ट कामगिरी केली. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल केंद्रीय हिंदी संस्थानच्या वतीने त्यांना अधिकृत प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
चेतन जाधव यांच्या या यशाबद्दल संस्थेचे पदाधिकारी, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, मित्रपरिवार तसेच शिक्षण क्षेत्रातील विविध मान्यवरांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. अध्यापनासोबतच प्रशिक्षण व परीक्षेत मिळविलेले हे यश इतर शिक्षकांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे.

Leave a Reply