अमळनेर बाजार समितीत दीड कोटींचे ‘राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन होणार

शासनाची प्रशासकीय मान्यता, ७५.१८ लाखांचे अनुदान मंजूर

अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात ‘राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन’ उभारण्यासाठी महाराष्ट्र शासनाने १ कोटी ५० लाख ३६ हजार ७८८ रुपयांच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता दिली आहे. सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने ८ जुलै २०२६ रोजी यासंदर्भातील शासन निर्णय प्रसिद्ध केला असून, अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या शेतकरी भवनाच्या उभारणीचा मार्ग आता मोकळा झाला आहे.

राज्यात ज्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये शेतकरी भवन उपलब्ध नाही किंवा विद्यमान इमारती जीर्ण अवस्थेत आहेत, अशा ठिकाणी ‘राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन’ उभारण्याची योजना शासनाने हाती घेतली आहे. या योजनेअंतर्गत अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. शासन निर्णयानुसार या प्रकल्पासाठी ७५ लाख १८ हजार रुपयांचे (५० टक्के) शासन अनुदान दोन समान टप्प्यांत वितरित करण्यात येणार आहे. उर्वरित निधी बाजार समितीला स्वतःच्या स्वनिधीतून किंवा कर्जाच्या माध्यमातून उपलब्ध करावा लागणार आहे. तसेच निविदा प्रक्रियेनंतर मंजूर होणारी रक्कम प्रशासकीय मंजुरीपेक्षा कमी असल्यास, त्याच मंजूर निविदा रकमेच्या ५० टक्के इतकेच शासन अनुदान देण्यात येणार असल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे. शेतकरी भवनाच्या बांधकामापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपअभियंता (स्थापत्य) यांच्याकडून तांत्रिक मान्यता घेणे बंधनकारक राहणार आहे. त्यानंतर विहित कार्यपद्धतीनुसार निविदा प्रक्रिया राबवून कार्यारंभ आदेश दिले जातील. तसेच बाजार समितीच्या सचिवांनी बांधकामाच्या प्रगतीचा अहवाल वेळोवेळी जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, जळगाव यांच्याकडे सादर करण्याचे निर्देशही शासनाने दिले आहेत. प्रशासकीय मान्यता मिळाल्यापासून एका वर्षाच्या आत हे बांधकाम पूर्ण करण्याची अट घालण्यात आली आहे. शेतकरी भवनाचा दैनंदिन खर्च, देखभाल-दुरुस्ती, वीज, पाणी, मनुष्यबळ तसेच इतर सर्व खर्च बाजार समितीनेच करावयाचा असून त्यासाठी शासनाकडून कोणताही अतिरिक्त निधी दिला जाणार नसल्याचे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.

या शेतकरी भवनासोबत शेतकऱ्यांसाठी नाममात्र ५ रुपयांत भोजनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील मोजक्याच कृषी उत्पन्न बाजार समित्यांना या योजनेचा लाभ मिळाला असून त्यामध्ये अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचाही समावेश आहे. पणन मंत्री जयकुमार रावल यांच्या सहकार्याने तसेच खासदार स्मिता वाघ आणि आमदार अनिल पाटील यांच्या प्रयत्नांतून हा प्रकल्प मंजूर झाल्याचे सांगण्यात आले. याबद्दल सभापती अशोक आधार पाटील, उपसभापती सुरेश पाटील तसेच संचालक मंडळाने शासनाचे आभार मानले आहेत.

 

सातत्यपूर्ण पाठपुराव्याला आले यश

 

“सदरच्या शेतकरी भवना साठी ३ वर्षांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आल्याचे समाधान आहे. या नवीन दीड कोटीच्या शेतकरी भवनामुळे बाजार समितीत शेतीमाल विक्रीसाठी येणाऱ्या गोर गरीब कष्टकरी, सामान्य शेतकरी पुरुष, महिलांना मुक्काम, विश्रांतीची सोय तसेच आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध होणार आहेत. सोबतच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज भोजन व्यवस्था असणार असून त्यात ४० रु शासन अनुदान, ५ रु बाजार समितीचे प्रतिव्यक्ती खर्च असेल तर सदरचे भोजन हे शेतकऱ्याला केवळ नाममात्र ५ रुपयात मिळेल. त्यामुळे अमळनेरसह परिसरातील हजारो शेतकऱ्यांसाठी ही सुविधा मोठा दिलासा ठरणार असून सोबत हमाल मापाडीसाठीही यात एक भवन असेल. कष्टकरी शेतकऱ्यांना दिलेला शब्द पूर्ण होत असल्याचे समाधान आहे. पणन मंत्री ना. जयकुमारजी रावल, खासदार स्मिताताई वाघ, तालुक्याचे कार्यकुशल आमदार अनिलदादा पाटील यांचे मोलाची मदत व सहकार्य लाभले.”

– अशोक आधार पाटील, सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, अमळनेर

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *