
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले जयंतीनिमित्त शहरात विविध स्पर्धांचे आयोजन
अमळनेर (प्रतिनिधी) भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती आणि क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंती महोत्सवानिमित्त शहरात विविध सामाजिक उपक्रम व स्पर्धांचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक परिषद’ आणि ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती २०२६’ यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात येत असून, विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणे तसेच समाजात सामाजिक बांधिलकीची भावना निर्माण करणे हा यामागील उद्देश आहे.
या जयंती महोत्सवानिमित्त ११ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ७ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पटांगण येथे रांगोळी व चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच १२ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ६ वाजता महाराणा प्रताप चौक येथून भव्य मॅरेथॉन स्पर्धेला सुरुवात होणार आहे. ही स्पर्धा खुला गट आणि महिला गट अशा दोन स्वतंत्र गटांमध्ये घेण्यात येणार असून खुल्या गटासाठी प्रथम ७,०००, द्वितीय ५,००० व तृतीय ३,०००, तर महिला गटासाठी प्रथम ५,०००, द्वितीय ३,००० व तृतीय २,००० रुपये अशी पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. याच दिवशी सकाळी ११ ते दुपारी १२ या वेळेत साने गुरुजी शाळेत सामान्य ज्ञान स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. महापुरुषांच्या विचारांचा जागर करून सामाजिक ऐक्य व बंधुभाव दृढ करण्याच्या उद्देशाने आयोजित या स्पर्धांमध्ये शहरातील विद्यार्थी, युवक, महिला आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक परिषद’ आणि ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती’ यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply