
अमळनेरात घरफोड्यांची मालिका; बंद घर फोडून १० हजारांचा ऐवज लंपास
अमळनेर (प्रतिनिधी) : ढेकू रस्त्यावरील हिरकणी नगर परिसरात बंद घर फोडून अज्ञात चोरट्यांनी सुमारे १० हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना २२ ते २६ ऑगस्टदरम्यान घडली. दरम्यान, याच कालावधीत अमळनेर शहरात तीन ते चार ठिकाणी घरफोडीचे प्रयत्न झाल्याची माहिती समोर आली असून, काही नागरिकांनी किरकोळ चोरी झाल्याने पोलिसांत तक्रार देण्यास असमर्थता दर्शविली आहे. त्यामुळे शहरात चोरट्यांची टोळी सक्रिय असल्याची शक्यता व्यक्त होत आहे.
ढेकू रस्त्यावरील हिरकणी नगरमधील प्लॉट क्रमांक १४ चे मालक विलास पाटील हे २२ ते २६ ऑगस्टदरम्यान बाहेरगावी गेले होते. घर बंद असल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी इंटरलॉकिंग सिस्टीम तोडून घरात प्रवेश केला. घरातील सुमारे १० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेण्यात आला. विलास पाटील यांचे पुतणे महेंद्र पाटील यांनी पोलिसांत खबर दिल्यानंतर या प्रकरणी भारतीय न्यायसंहिता कलम ३३१(३), ३३१(४) आणि ३०५(अ) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
दरम्यान, अमळनेर शहरात चोरट्यांनी तीन ते चार घरे फोडण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. एका घरातून चोरट्यांनी केवळ कुलूप नेले, तर तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांच्या बंद घराचेही कुलूप तोडून चांदीच्या समया आणि रोख रकमेसह सुमारे ३० ते ४० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याचे समोर आले आहे. काही ठिकाणी किरकोळ रकमेची चोरी झाल्याने संबंधितांनी पोलिसांत फिर्याद दिलेली नाही. शहरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे नेटवर्क पोलिसांच्या तपासासाठी महत्त्वाचे ठरत असून, चोरट्यांच्या हालचाली त्यामध्ये टिपल्या गेल्याची माहिती आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांकडून चोरट्यांचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
चोर बाहेरगावचे असावेत
“चोर बाहेरगावचे असावेत. चार पाच जणफ टोळीने येऊन घरफोड्या करीत आहेत. दिवसा रेकी करत असावेत. मात्र गुन्हे दाखल असो नसो चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पथक रवाना केले असून तांत्रिक यंत्रणेची मदत घेतली जात आहे.”
— दत्तात्रय निकम, पोलीस निरीक्षक, अमळनेर

Leave a Reply