
अमळनेरात २७ एप्रिल रोजी श्री संत सद्गुरु सखाराम महाराजांचा निघणार रथोत्सव
अमळनेर (प्रतिनिधी ) येथील श्री सद्गुरु सखाराम महाराज विठ्ठल-रुक्मिणी संस्थानतर्फे श्री संत सद्गुरु सखाराम महाराजांचा वार्षिक रथोत्सव २७ एप्रिल रोजी साजरा केला जाणार आहे. या उत्सवात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची मांदियाळी पाहायला मिळणार आहे.
या उत्सवाची सुरुवात अक्षयतृतीया, रविवार दि. १९ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता स्तंभरोपण व ध्वजारोहणाने होणार आहे. दि. १९ ते २६ एप्रिल दरम्यान दररोज सकाळी ९ ते १२ या वेळेत श्री संत तुकाराम महाराज गाथा भजनाचे आयोजन करण्यात आले असून ह.भ.प. शारंगधर महाराज यांच्यासह इतर कीर्तनकार व वारकरी शिक्षण पाठशाळेतील विद्यार्थी सहभागी होणार आहेत. दि. २६ एप्रिल रोजी ह.भ.प. मोहन महाराज बेलापूरकर यांच्या दिंडीचे आगमन होऊन रात्री कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे. मोहिनी एकादशी, दि. २७ एप्रिल रोजी सायंकाळी रथोत्सव सोहळा पार पडणार असून विविध कला प्रदर्शन व आदिवासी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात ता. बागलाण, जि. नाशिक येथील माळीवाडा गावातील कलाकार सहभाग नोंदवणार आहेत. दि. ३० एप्रिल रोजी सायंकाळी ९ वाजता श्री संत सद्गुरु सखाराम महाराज पुण्यतिथीनिमित्त प्रमुख दिवस साजरा होणार असून भक्तनिवास, वाडी चौक येथे सर्वरोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. दि. १ मे रोजी सकाळी ६ वाजता पालखी सोहळ्यावेळी भुसावळ रेल्वे बँड तसेच सायंकाळी ५ वाजल्यापासून श्री सद्गुरु ब्रास बँड, चाळीसगाव यांच्या साथीने पालखी सोहळा पार पडणार आहे. उत्सवाची सांगता दि. २ मे रोजी ह.भ.प. मोहित महाराज बेलापूरकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने होणार असल्याची माहिती संस्थानतर्फे देण्यात आली आहे. उत्सव काळात विविध स्थानिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन विश्वस्त मंडळाने केले आहे.

Leave a Reply