कांतीलाल पहाडे यांचे मरणोत्तर देहदान; पहाडे परिवारातील दुसरा प्रेरणादायी उपक्रम

अमळनेर (प्रतिनिधी) येथील प्रमुख पेट्रोल पंप मागील प्रताप मिल परिसरातील रहिवासी कांतीलाल हिरालाल पहाडे (वय ९५) यांचे दिनांक ३१ मार्च रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनानंतर अमळनेर लायन्स क्लब यांच्या माध्यमातून त्यांचे मरणोत्तर देहदान धुळे येथील भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे करण्यात आले.

विशेष म्हणजे अमळनेर लायन्स क्लबच्या माध्यमातून पहाडे परिवारातील हे दुसरे देहदान ठरले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, गेल्या वर्षी महावीर पहाडे यांच्या मातोश्री कांताबाई पहाडे यांचेही देहदान करण्यात आले होते. कांतीलाल पहाडे यांनी यापूर्वीच लायन्स क्लबच्या माध्यमातून मरणोत्तर देहदानाचा संकल्प केला होता.

दुपारी १२.३० वाजता त्यांचे निधन झाल्यानंतर लायन्स क्लबचे अध्यक्ष डॉ. संदीप जोशी यांना कळविण्यात आले. त्यानंतर लायन्स सदस्य तात्काळ तेथे पोहोचले व धुळे येथील वैद्यकीय महाविद्यालयाशी संपर्क साधण्यात आला. सायंकाळी ५ वाजता सर्वांनी अंतिम दर्शन घेतल्यानंतर मृतदेह धुळे येथील शासकीय रुग्णालयात पोहोचवून रुग्णालय प्रशासनाकडे सुपूर्द करण्यात आला. यावेळी लायन्स क्लबचे पदाधिकारी, सदस्य तसेच पहाडे परिवारातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर देहदान भावी डॉक्टरांच्या शिक्षणासाठी उपयुक्त ठरणार असून यातून अनेक डॉक्टर घडण्यास मदत होणार आहे. इतर कुटुंबांनीही पहाडे परिवाराचा आदर्श घेऊन देहदानासाठी पुढे यावे, असे आवाहन अमळनेर लायन्स क्लबतर्फे करण्यात आले आहे. कांतीलाल पहाडे हे पवन व संजय पहाडे यांचे वडील होत.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *