श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक केंद्रात गुरुपौर्णिमा भक्तिभावात; शेकडो सेवेकऱ्यांनी स्वीकारले गुरुपद

अमळनेर (प्रतिनिधी) येथील श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक केंद्रात गुरुपौर्णिमेनिमित्त बुधवार, दि. २९ रोजी गुरुपद स्वीकारण्याचा सोहळा भक्तिमय वातावरणात आणि उत्साहात पार पडला. दिवसभर नामस्मरण, माळ जप, पोथी वाचन, भजन, आरती तसेच गुरुपद स्वीकारण्यासाठी भाविक व सेवेकऱ्यांची मोठी गर्दी झाली होती.

गुरुपौर्णिमेनिमित्त केंद्र परिसर आकर्षक फुलांच्या सजावटीने नटला होता. मुख्य प्रवेशद्वारासमोर रंगीबेरंगी रांगोळी साकारण्यात आली होती. सकाळी आठ वाजता आरतीनंतर गुरुपद स्वीकारण्याच्या कार्यक्रमास प्रारंभ झाला. यावेळी महिला व पुरुष सेवेकऱ्यांनी श्रद्धेने श्री स्वामी समर्थ महाराजांना आपल्या जीवनातील सद्गुरू म्हणून स्वीकारत गुरुपद धारण केले. यावेळी उपस्थितांना श्री स्वामी समर्थ महाराजांनी दिलेली सेवा, सदाचार, नामस्मरण, परोपकार आणि अध्यात्माची शिकवण जीवनात अंगीकारण्याचे महत्त्व सांगण्यात आले. स्वामींचे विचार आचरणात आणण्याचा संकल्प अनेक सेवेकऱ्यांनी व्यक्त केला. दिवसभर स्वामींच्या नामाचा अखंड गजर, माळ जप, पोथी वाचन आणि भजनामुळे संपूर्ण केंद्र परिसर भक्तिरसाने भारावून गेला होता. रात्री उशिरापर्यंत दर्शनासाठी तसेच गुरुपद स्वीकारण्यासाठी भाविकांची वर्दळ सुरू होती. गुरुपौर्णिमेच्या पावन पर्वानिमित्त आयोजित या सोहळ्यात श्रद्धा, भक्ती, सेवा आणि अध्यात्माचा अनोखा संगम अनुभवायला मिळाला. कार्यक्रमाला महिला व पुरुष सेवेकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व सेवेकऱ्यांनी परिश्रम घेतले. गुरुपौर्णिमेनिमित्त दिवसभर मोठ्या संख्येने भाविकांनी दर्शन घेत गुरुपद स्वीकारण्याचा लाभ घेतल्याची माहिती केंद्रप्रमुख अमोल पाटील यांनी दिली.

 

२५ सेवेकऱ्यांचे रक्तदान

 

गुरुपौर्णिमेनिमित्त वरद ब्लड सेंटर, धुळे यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात २५ सेवेकऱ्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकीचा संदेश दिला. रक्तदात्यांचे गुणवंत देशमुख आणि सरिता देशमुख यांनी आभार मानले.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *