गणपतींचे स्मरण करून लोककल्याणासाठी उपसंकल्प; मंगळग्रह देवांचा महारुद्र अभिषेक

अमळनेर (प्रतिनिधी) येथील मंगळग्रह सेवा संस्था संचलित श्री मंगळग्रह मंदिरात राष्ट्रकल्याण, संरक्षण, समृद्धी तसेच संस्थेच्या विविध संकल्पपूर्तीनिमित्त आयोजित तीन दिवसीय भव्य महारुद्र अभिषेक पूजेला बुधवार, दि. ९ सप्टेंबर रोजी सकाळी सुरुवात झाली. प्रधान आचार्य तथा वेदमूर्ती केशव पुराणिक गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली चैतन्यमय, भक्तीमय आणि मंगलमय वातावरणात गुरुवार, दि. १० सप्टेंबर रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास द्वितीय दिवसाची पूजा सुरू झाली. मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले व त्यांच्या पत्नी आशाताई महाले यांच्या शुभहस्ते या विशेष धार्मिक सोहळ्यातील अनुष्ठानास सुरुवात झाली.

मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे प्रथमच तीन दिवसीय भव्य महारुद्र पूजा आयोजित करण्यात आली आहे. या महापूजेची आज, शुक्रवार, दि. ११ सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजता पूर्णाहुती होऊन सांगता होणार आहे. महापूजेच्या प्रारंभी गणपतींचे स्मरण करून लोककल्याणासाठी उपसंकल्प करण्यात आला. त्यानंतर मागील दिवशी स्थापित केलेल्या देवतांचे पूजन करण्यात आले. यामध्ये गणपती पूजन, वरुण देवता पूजन, मातृका पूजन तसेच न्यास करून श्री मंगळग्रह देवांच्या महारुद्र पूजेचा संकल्प सोडण्यात आला. श्री मंगळग्रह देवांचा विविध सुगंधी द्रव्यांसह पंचामृत व रुद्र अभिषेक करण्यात आला. त्यानंतर देवांची शृंगार पूजा झाली..दुपारी स्थापित देवतांचे सायंपूजन करण्यात आले. काही रुद्र आवर्तने झाल्यानंतर सायंकाळी सहा वाजता महाआरती करण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. अशा प्रकारे द्वितीय दिवसाच्या महापूजेची सांगता झाली. दरम्यान, जळगाव विमानतळाचे प्रमुख विमानतळ संचालक हर्षकुमार त्रिपाठी यांनी महारुद्र पूजास्थळी काही वेळ उपस्थित राहून पूजा-अर्चेत सहभाग घेतला आणि श्री मंगळग्रह देवांचे दर्शन घेतले.

 

अयोध्या, प्रयागराजच्या पुरोहितांचा सहभाग

 

महारुद्र पूजेसाठी अयोध्या व प्रयागराज येथून विशेष पुरोहितांना निमंत्रित करण्यात आले आहे. यामध्ये गौरव मिश्रा, सूरज मिश्रा, मनजीत मिश्रा व हरिओम शुक्ल यांचा समावेश आहे.

महारुद्र पूजेच्या पौरोहित्यासाठी वेदमूर्ती व्यंकटेश कळवे गुरुजी, सारंग पाठक, अथर्व कुलकर्णी, शुभम वैष्णव, यश जोशी, चंद्रकांत जोशी, परशुराम शर्मा, तुषार दीक्षित, प्रसाद भंडारी, जयेंद्र वैद्य, मंदार कुलकर्णी, वैभव लोकाक्षी, अक्षय जोशी, गणेश जोशी, पवन शर्मा, विनोद पाठक, दिव्येश जोशी, शैलेश जोशी, उमेश पंचभाई, निलेश रोडे, हेमंत गोसावी, गौरव मिश्रा, सूरज मिश्रा, मनजीत मिश्रा व हरिओम शुक्ल सहभागी आहेत. त्यांना उमेश पाठक, प्रवीण भंडारी व चेतन नाईक सहकार्य करीत आहेत.

 

१०८ लिंगांचे ‘श्री अष्टोत्तरशत लिंगतोभद्र मंडल’ साकार

 

तीन दिवसीय महारुद्र पूजेच्या पूर्णाहुतीची तयारी पूर्ण करण्यात आली आहे. यामध्ये भगवान शंकरांची १०८ लिंगे आणि त्यांच्याशी संबंधित शिवशक्तींची स्थापना केलेले ‘श्री अष्टोत्तरशत लिंगतोभद्र मंडल’ श्री मंगळग्रह मंदिरासमोरील सभामंडपात विविध रंगांच्या तांदळातून आकर्षकपणे रेखाटण्यात आले आहे. संपूर्ण परिसर फूलमाळांनी सजविण्यात आला आहे.

सनातन धर्मशास्त्रातील आणि वेदोक्त कर्मकांडातील हे अत्यंत पवित्र व शक्तिशाली तांत्रिक-वैदिक मंडल मानले जाते. मोठ्या प्रमाणावर याग, महायज्ञ, रुद्रयाग किंवा विशेष शिव अनुष्ठानाच्या वेळी वेदीवर विविध रंगांच्या तांदळाने किंवा धान्याने हे मंडल रेखाटले जाते. याच ठिकाणी भगवान शिवशंकर व माता पार्वती यांच्या प्रतिमाही आकर्षक स्वरूपात उभारण्यात आल्या आहेत.

 

आज पूर्णाहुती; भाविकांना सहभागाचे आवाहन

 

भगवान श्री मंगळग्रह देवांची सर्वांवर कृपा राहावी, सर्वांचे रक्षण व कल्याण व्हावे, तसेच मातृभूमीचे आणि जगाचे कल्याण व्हावे, या उद्देशाने महारुद्र स्वाहाकारामध्ये श्री मंगळग्रह देव आणि भगवान शंकर यांची आराधना करण्यात येत आहे. अनावृष्टी, अतिवृष्टी, जलप्रलय, आगी, भूकंप, ज्वालामुखी, उल्कापात तसेच जगावर निर्माण झालेले युद्धाचे सावट आणि दहशतवाद व देशविघातक कारवायांमुळे निर्माण होणाऱ्या संकटांतून देशाचे व जगाचे रक्षण व्हावे, यासाठी ही महापूजा होत असल्याचे मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे सांगण्यात आले. महारुद्र अभिषेक पूजेत श्री मंगळग्रह मंदिरातील स्वयंभू अतिजागृत मूर्तीवर ११ लघुरुद्र, म्हणजेच १,३३१ रुद्र आवर्तने, करण्यात येणार आहेत. शुक्रवार, दि. ११ सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजता श्री मंगळग्रह देव मंदिरातील स्थापित सर्व देवतांसाठी हवन, बलिदान व पूर्णाहुती होणार आहे. पूर्णाहुतीचा हवन कार्यक्रम दिवसभर चालणार असून भाविकांनी पूर्ण वेळ उपस्थित राहावे. शक्य नसल्यास किमान दहा मिनिटे वेळ काढून हवनामध्ये सहभागी व्हावे, असे कळकळीचे आवाहन मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे करण्यात आले आहे.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *