जनतेच्या विश्वासाला राष्ट्रीय पातळीवर मानाची पावती; खासदार स्मिता वाघ यांना सलग दुसऱ्यांदा ‘संसद रत्न’

अमळनेर (प्रतिनिधी) जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या खासदार स्मिता वाघ यांना प्रतिष्ठेचा ‘संसद रत्न पुरस्कार २०२६’ प्रदान करण्यात आला असून, हा राष्ट्रीय सन्मान त्यांना सलग दुसऱ्या वर्षी मिळाला आहे. संसदेतील प्रभावी उपस्थिती, जनहिताचे प्रश्न सातत्याने मांडणे आणि लोकप्रतिनिधी म्हणून केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना हा पुरस्कार देण्यात आला.

पुरस्कार स्वीकारल्यानंतर भावना व्यक्त करताना खासदार स्मिता वाघ यांनी हा गौरव केवळ वैयक्तिक नसून जळगाव लोकसभा मतदारसंघातील जनतेने दाखविलेल्या विश्वासाचा सन्मान असल्याचे सांगितले. संसदेत उपस्थित केलेले प्रश्न, विकासकामांसाठी केलेल्या मागण्या आणि जनहितासाठी घेतलेले विविध पुढाकार यामागे मतदारसंघातील नागरिकांच्या अपेक्षा व समस्या केंद्रस्थानी असल्याचे त्यांनी नमूद केले.

“गतवर्षी मिळालेल्या पहिल्या ‘संसद रत्न’ सन्मानाने अधिक जोमाने काम करण्याची प्रेरणा दिली. सलग दुसऱ्यांदा मिळालेल्या या पुरस्कारामुळे जनतेप्रती असलेली जबाबदारी आणखी वाढली आहे,” असे खासदार स्मिता वाघ यांनी सांगितले. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण तसेच जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचे मार्गदर्शन व विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. तसेच संसद रत्न पुरस्कार समिती, ज्युरी सदस्य, संसदीय सहकारी, भाजप परिवारातील पदाधिकारी व कार्यकर्ते, सहकारी आणि शुभेच्छुकांचेही त्यांनी आभार मानले.

‘संसद रत्न पुरस्कार २०२६’ प्राप्त झालेल्या सर्व सहकारी खासदारांचे अभिनंदन करताना जनतेच्या प्रश्नांसाठी प्रभावीपणे काम करण्याची प्रेरणा या सन्मानातून मिळत असल्याचे खासदार स्मिता वाघ यांनी सांगितले. खासदार स्मिता वाघ यांना सलग दुसऱ्यांदा प्राप्त झालेल्या या राष्ट्रीय सन्मानाबद्दल जळगाव जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *