अमळनेरात शाळेजवळ गुटखा-तंबाखू विक्री करणाऱ्यावर पोलिसांनी केली कारवाई

अमळनेर (प्रतिनिधी) शाळेच्या परिसरात गुटखा, तंबाखू, बिडी आणि सिगारेटची विक्री करणाऱ्या पानटपरी चालकावर अमळनेर पोलिसांनी कारवाई केली आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्यास अपायकारक ठरणाऱ्या या बेकायदेशीर विक्रीविरुद्ध पोलिसांनी तातडीने पावले उचलत संबंधिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ८ तारखेला सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास हेडकॉन्स्टेबल सुनील तेली, उज्वलकुमार म्हस्के आणि सूर्यकांत साळुंखे हे शहरात नियमित गस्तीवर होते. यावेळी गलवाडे रस्त्यावरील ग्लोबल शाळेजवळ नामदेव भीमराव पाटील (रा. भवानी चौक, ताडेपूरा) हा आपल्या पानटपरीवर तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करताना आढळून आला. शाळेजवळ अशा पदार्थांची विक्री करणे कायद्याने प्रतिबंधित असल्याने पोलिसांनी तत्काळ कारवाई करत त्याच्याकडील सिगारेट, तंबाखू आणि इतर साहित्य जप्त केले. संबंधिताविरुद्ध सिगारेट आणि तंबाखूजन्य पदार्थ विक्री प्रतिबंध अधिनियम, २००३ (कोटपा) अंतर्गत कलम ६(ब) व २४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास हेडकॉन्स्टेबल सुनील तेली करीत आहेत. दरम्यान, शाळांच्या परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री रोखण्यासाठी पोलिसांकडून सातत्याने विशेष मोहीम राबविण्यात येत असून अशा प्रकारांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पोलिस प्रशासनाने दिला आहे. विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि भवितव्य सुरक्षित ठेवण्यासाठी नागरिकांनीही अशा बेकायदेशीर प्रकारांची माहिती पोलिसांना देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *