
अवघ्या एका तासात चोरीचा छडा; अमळनेर पोलिसांची जलद कारवाई, व्यापाऱ्याचे ७८ हजार रुपये सुरक्षित परत
पैसे खाली पडल्याचे सांगत पळवली होती रक्कम
अमळनेर (प्रतिनिधी) पैसे खाली पडल्याचे भासवून अडत व्यापाऱ्याच्या मोटारसायकलवर ठेवलेली पैशांची पिशवी लांबवणाऱ्या आरोपींना अमळनेर पोलिसांनी अवघ्या एका तासात अटक करत चोरीस गेलेली रक्कम हस्तगत केली. पोलिसांच्या या जलद आणि अचूक कारवाईमुळे व्यापाऱ्याला मोठा दिलासा मिळाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, अमळनेर शहरातील बहादरपूर रस्त्यावरील झामी चौक परिसरातील अडत व्यापारी आण्णासाहेब साहेबराव महाजन हे दि. २ रोजी दुपारी १२.३० वाजता मोटारसायकल (क्र. एमएच-19, डीएक्स- 4057) वरून २ लाख ८ हजार रुपये बँकेत भरण्यासाठी निघाले होते. त्यांनी आयसीआयसीआय बँकेत १ लाख ३० हजार रुपये भरल्यानंतर उरलेले ७८ हजार रुपये जमा करण्यासाठी महाराष्ट्र बँकेत गेले. दुपारी १.५० वाजता बँकेबाहेर पडत असताना एका अनोळखी इसमाने “पैसे खाली पडले आहेत” असे सांगितले. महाजन पैसे उचलण्यासाठी खाली वाकताच आरोपीने मोटारसायकलवर ठेवलेली पैशांची पिशवी घेऊन पळ काढला.
घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी तातडीने शोध पथकाला हालचालीचे आदेश दिले. पोलीस उपनिरीक्षक शरद काकळीज, हेडकॉन्स्टेबल मिलिंद सोनार, प्रशांत पाटील, उज्वल म्हस्के, विनोद संदानशिव व नितीन मनोरे यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपींचा माग काढला. तपासात तीन ते चार आरोपी असल्याचे निष्पन्न झाले.
आरोपी चोपड्याकडे पलायन करत असल्याची माहिती मिळताच अमळनेर पोलिसांनी पाठलाग सुरू केला व चोपडा पोलिसांशी तात्काळ समन्वय साधला. वेले गावाजवळ चोपडा पोलिसांनी आरोपींना थांबवून ठेवले असता अमळनेर पोलिसांनी झडप घालून अवघ्या एका तासात तिघा आरोपींना ताब्यात घेतले. पोलिसी चौकशीत आरोपींनी आपली नावे बालू बारगुंडा, शिवकुमार व्यंकटस्वामी बारगुंडा व गणेश शुभ्रमणी तेली (रा. अमरनगर, उज्जैन, मध्यप्रदेश) अशी सांगितली. त्यांच्याकडून चोरीची रक्कम जप्त करण्यात आली आहे. अमळनेर पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास हेडकॉन्स्टेबल मिलिंद सोनार करीत आहेत. अमळनेर पोलिसांच्या तत्परतेमुळे व्यापाऱ्याचा पैसा सुरक्षित परत मिळाल्याने नागरिकांनी पोलिसांच्या कार्याचे कौतुक केले आहे.

Leave a Reply