
गोगादेव नवमीला अमळनेरात भव्य छडी मिरवणूक; हिंदू-मुस्लिम-शीख ऐक्याचा दिला संदेश
अमळनेर (प्रतिनिधी) : जाहरवीर गोगादेव महाराज हिंदू, मुस्लिम आणि शीख धर्माचा आदर व सन्मान करत असल्याने त्यांना जातीय सलोख्याचे प्रतीक मानले जाते. गोगादेव महाराजांच्या विचारांप्रमाणे सर्वांनी जातीय सलोखा टिकवून ठेवावा, अशी प्रतिक्रिया आमदार अनिल पाटील यांनी गोगादेव जयंतीनिमित्त व्यक्त केली.
अमळनेर शहरातील झामी चौक परिसरात विकी जाधव, बुध्दा जाधव, महेश जाधव आणि शक्ती दाभोळे यांच्या आयोजनातून गोगादेव नवमीनिमित्त कार्यक्रम घेण्यात आला. भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षातील नवमीला देशभर गोगा नवमी उत्सव साजरा केला जातो. यानिमित्त अमळनेरात आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते गोगा महाराजांची आरती करण्यात आली.
त्यानंतर झामी चौक, पवन चौक, तिरंगा चौक, सुभाष चौक, पाच कंदील चौक आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकापर्यंत गोगादेव महाराजांची मूर्ती असलेली भव्य छडी मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत महादेव-पार्वती, रतनसिंग चावरीया, गोरक्षनाथ, राजस्थानचे रामदेव बाबा आणि श्रीराम यांच्या मूर्ती रथावर ठेवण्यात आल्या होत्या. पाच बँडच्या गजरात निघालेल्या या मिरवणुकीत सुमारे चार ते पाच हजार नागरिक सहभागी झाले होते. मिरवणुकीमुळे शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. विविध समाजघटकांनी सहभागी होत एकात्मता आणि सामाजिक सलोख्याचा संदेश दिला.
यावेळी माजी आमदार शिरीष चौधरी, नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर, पोलीस उपनिरीक्षक शरद काकळीज, शेतकी संघ संचालक विक्रांत पाटील, पत्रकार जितेंद्र ठाकूर, माजी नगरसेवक नरेंद्र चौधरी, अनिल महाजन, बांधकाम सभापती साहेबराव पवार, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष भूषण भदाणे, राजाराम बडगुजर, शिक्षण सभापती नावेद शेख, दीपक चौगुले, तुळशीराम हटकर, सुनील शिंपी, सोमचंद संदानशीव, राजू चंडाले, अनिल बेंडवाल आणि गौरव महाजन उपस्थित होते. सूत्रसंचालन करून आभार संजय पाटील यांनी मानले.

Leave a Reply