
कत्तलीच्या संशयावरून दोन गोऱ्हे जप्त, जपान जीन परिसरात पोलिसांची कारवाई
अमळनेर (प्रतिनिधी) कत्तल करण्याच्या हेतूने निर्दयीपणे दोन गोऱ्हे बांधून ठेवण्यात आल्याची माहिती मिळाल्यानंतर अमळनेर पोलिसांनी छापा टाकून दोन्ही जनावरे जप्त केली. ही कारवाई २४ रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास जपान जीन परिसरातील रेल्वे पटरीजवळ करण्यात आली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, रईस पठाण (रा. गांधलीपुरा) याने जपान जीन परिसरातील पत्र्याच्या शेडमध्ये सुमारे १५ हजार रुपये किमतीची दोन गोऱ्हे बांधून ठेवली होती. संबंधित जनावरांना खायला-प्यायला न देता निर्दयीपणे दोरीने घट्ट बांधून ठेवण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांना मिळाली होती. या माहितीनंतर पोलीस निरीक्षक निकम यांनी पोलीस उपनिरीक्षक समाधान गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक शरद काकळीज, विनोद भोई, चंद्रकांत पाटील, मंगल भोई तसेच डीबी पथकाला कारवाईचे आदेश दिले. पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी छापा टाकला असता दहा ते बारा महिने वयाची दोन गोऱ्हे खायला-प्यायला न देता दोरीने घट्ट बांधून ठेवलेली आढळून आली. पोलिसांनी पंचनामा करून दोन्ही जनावरे ताब्यात घेतली. याप्रकरणी रईस शेख याच्याविरुद्ध प्राण्यांना क्रूरतेने वागणूक देणे प्रतिबंधक कायदा १९६० अंतर्गत कलम ११(१)(अ)(ई) तसेच महाराष्ट्र प्राण्यांचे जतन सुधारणा कायदा २०१५ मधील कलम ५(अ)(क) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास हेड कॉन्स्टेबल अशोक साळुंखे करीत आहेत.

Leave a Reply