
जुना बसस्थानक परिसरातून चोरीच्या पल्सरसह तरुण ताब्यात; जळगावातील मोटारसायकल चोरीचा गुन्हा उघड
अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर शहर पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे केलेल्या कारवाईत चोरीच्या मोटारसायकलसह एका तरुणाला ताब्यात घेतले आहे. तपासादरम्यान संबंधित मोटारसायकल जळगाव येथील जिल्हापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरीस गेल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर संशयितास पुढील कायदेशीर कारवाईसाठी जिल्हापेठ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून त्याच्याकडून आणखी चोरीच्या वाहनांचा उलगडा होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दि. १६ जुलै २०२६ रोजी पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शरद काकडीज, पोलीस हेड कॉन्स्टेबल मिलिंद सोनार, सुनील तेली तसेच पोलीस कॉन्स्टेबल निलेश मोरे आणि विनोद संदानशिव हे शहरात गस्त घालत असताना जुन्या बसस्थानक परिसरात चोरीच्या मोटारसायकलसह एक संशयित फिरत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत कारवाई केली.
जुन्या बसस्थानक परिसरात काळ्या रंगाची लाल पट्टे असलेली बजाज पल्सर (क्रमांक एमएच १९ ईसी ६८४६) मोटारसायकल घेऊन उभ्या असलेल्या तरुणाची पोलिसांनी चौकशी केली. वाहनाच्या मालकीबाबत तसेच कागदपत्रांबाबत विचारणा केली असता तो समाधानकारक उत्तरे देऊ शकला नाही. त्याच्याकडे वाहनाची कोणतीही कागदपत्रे नसल्याने पोलिसांचा संशय बळावला आणि त्याला ताब्यात घेण्यात आले.
पोलीस ठाण्यात अधिक तपास केल्यानंतर संबंधित मोटारसायकल जळगाव येथील जिल्हापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरीस गेल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १०७/२०२६ भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
ताब्यात घेतलेल्या संशयिताने आपले नाव उमेश प्रदीप पाटील (वय २२, रा. पिंगळवाडे, ता. अमळनेर) असे सांगितले. त्याला चोरीच्या मोटारसायकलीसह पुढील तपास व कायदेशीर कारवाईसाठी जिल्हापेठ पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. प्राथमिक तपासात संशयिताकडून आणखी चोरीच्या मोटारसायकली अथवा तत्सम गुन्ह्यांचा उलगडा होण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी त्या दृष्टीने तपासाची व्याप्ती वाढविली आहे. दरम्यान, अमळनेर पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले असून परिसरात संशयास्पद वाहन किंवा व्यक्ती आढळल्यास तात्काळ अमळनेर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा. माहिती देणाऱ्याची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात येईल, असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

Leave a Reply