
श्रावण पर्वानिमित्त श्री मंगळग्रह मंदिरात सत्यनारायण महापूजेचा भक्तिमय सोहळा
अमळनेर (प्रतिनिधी) : श्रावण पर्वानिमित्त येथील श्री मंगळग्रह मंदिरात मंगळवार, दि. २५ ऑगस्ट रोजी श्री सत्यनारायण महापूजेचे भक्तिमय वातावरणात आयोजन करण्यात आले. मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले यांच्या मार्गदर्शनाखाली धार्मिक परंपरेनुसार ही महापूजा विधिवत पार पडली. महापूजेचे विशेष मानकरी म्हणून नगरसेवक श्रीराम चौधरी व त्यांच्या पत्नी सुरेखाताई चौधरी या दाम्पत्याच्या शुभहस्ते भगवान विष्णूंच्या सत्यनारायण स्वरूपाची पूजा, सत्यनारायण कथाश्रवण व आरती आदी धार्मिक विधी करण्यात आले.
श्रावण महिना हिंदू धर्मपरंपरेत अत्यंत पवित्र आणि आध्यात्मिक साधनेसाठी महत्त्वाचा मानला जातो. भगवान शंकरांच्या उपासनेसह या महिन्यात विविध धार्मिक अनुष्ठाने, व्रत-वैकल्ये, पूजा-अर्चा आणि सत्यनारायण महापूजेला विशेष महत्त्व आहे. सत्य, श्रद्धा, सदाचार आणि कुटुंबाच्या मंगलमय जीवनासाठी प्रार्थना करण्याची पवित्र परंपरा म्हणून सत्यनारायण पूजेकडे पाहिले जाते. या महापूजेचे पौरोहित्य मंदिराचे पुरोहित परशुराम शर्मा व अक्षय जोशी यांनी केले. त्यांना उमेश पाठक यांनी सहकार्य केले. मंत्रोच्चार, धार्मिक विधी आणि भक्तिमय वातावरणामुळे सकाळपासूनच मंदिर परिसरात आध्यात्मिक वातावरण निर्माण झाले होते. महापूजा व आरतीनंतर उपस्थित भाविकांना तीर्थप्रसादाचे वाटप करण्यात आले. सकाळी ९ वाजेपासून रात्री १० वाजेपर्यंत श्री मंगळग्रह मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी श्री मंगळग्रहाचे दर्शन घेत तीर्थप्रसादाचा लाभ घेतला. श्रावण पर्वानिमित्त दिवसभर मंदिर परिसरात भाविकांची वर्दळ कायम होती. यावेळी मंगळग्रह सेवा संस्थेचे उपाध्यक्ष एस. एन. बाविस्कर, सचिव सुरेश बाविस्कर यांच्यासह मंगल सेवेकरी, मंदिर सेवेकरी आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply