
अमळनेर तालुक्यात बेकायदेशीर गुरांची वाहतूक; दोन वाहनांवर कारवाई, ११ गुरांसह लाखोंचा मुद्देमाल जप्त
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यात बेकायदेशीरपणे व निर्दयीपणे गुरांची वाहतूक करणाऱ्या दोन वाहनांवर अमळगाव व टाकरखेडा येथे मारवड अमळनेर पोलिसांनी कारवाई करून ११ गुरे व वाहनांसह लाखोंचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, २० मार्च रोजी पहाटे ४ वाजता पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या आदेशाने रात्रीच्या गस्तीवर असलेल्या हेडकॉन्स्टेबल संदेश पाटील , सुनील पाटील यांनी संशयित मालवाहू वाहन (क्रमांक एम पी ४३ झेड ई ७०१२) याला अडवले असता चालकाने वाहन न थांबवता टाकरखेडा रस्त्यावर वाहन जोरात पळवले. पोलिसांचा संशय अधिक बळावल्याने त्यांनी टाकरखेडा येथील हॉटेल चालक योगेश मिस्तरी याना फोन लावून सदरचे वाहन अडवण्यासाठी मदत करा म्हणून फोन लावला. त्यांनी रस्त्यावर वाहने आडवी लावून ठेवली. मालवाहू वाहन चालकाला हे दिसून येताच गावाच्या अलीकडेच त्याने वाहन थांबवून चालक व सोबतचा एक इसम पळून गेला. पोलिसांनी वाहन तपासले असता त्यात एकूण नऊ गोऱ्हे दाटीवाटीने कोंबून भरलेली आढळून आली. पोलिसांनी पंचनामा करून दोघांविरुद्ध प्राण्यांना क्रूरतेची वागणूक देण्यास प्रतिबंध करणारा कायदा कलम ११(ड)(ई)(फ)(क) ,भारतीय न्याय संहिता कलम ३(५) , महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १९९ ,मोटरवाहन कायदा कलम ३/१८१ , ६६/१९२ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला असून २ लाख रुपयांचे वाहन आणि ४८ हजाराची गुरे असा एकूण २ लाख ४८ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तपास हेडकॉन्स्टेबल संदेश पाटील करीत आहेत.
अमळगाव येथेही कारवाई
तर तालुक्यातील अमळगाव येथे एक वाहन (एमएच २० ईएल ४९९६) मध्ये बैल निर्दयीपणे बांधून एकमेकांना घासले जात असताना रस्त्याची परिस्थितीकडे दुर्लक्ष करून वाहन चालवले जात असल्याचे गोरक्षक सचिन अशोक महाजन (वय २१ रा झामी चौक अमळनेर) यांना निदर्शनास आल्यावर त्यांनी मारवड पोलीस स्टेशनचे एपीआय जीभाऊ पाटील, पीएसआय विनोद पाटील याना कळवले. वाहनाची तपासणी केली असता १८ हजार रुपयांची दोन गुरे आढळून आली. मारवड पोलीस स्टेशनला किस्मत नगर करवंद शिरपूर येथील वाहन चालक प्रल्हाद प्रकाश चौधरी (वय ३९) व अबरार शेख जहुर (वय २६) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता ३(५) ,प्राण्यांचा छळ प्रतिबंधक कायदा १९६० च्या कलम ११(१)(ड)(फ), प्राणी परिवहंन नियम ४८,४९ व मोटरवाहन कायदा १९८८ च्या कलम ६६ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला असून तपास एएसआय संजय पाटील करीत आहेत.

Leave a Reply