प्रलंबित मागण्यांसाठी सफाई कर्मचाऱ्यांचे नगर पालिकेसमोर बेमुदत ‘अन्न त्याग आंदोलन’ सुरू

अमळनेर (प्रतिनिधी) महाराष्ट्र शासनाच्या १३ ऑक्टोबर २०२४ रोजीच्या शासन निर्णयानुसार १९७५ पासून प्रलंबित असलेल्या प्रकरणांवर अद्याप निर्णय न झाल्याने तसेच अनुसूचित जातीच्या लाभार्थ्यांना त्यांच्या नैसर्गिक हक्कापासून वंचित ठेवण्यात येत असल्याच्या निषेधार्थ अखिल महाराष्ट्र सफाईगार व चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटनेच्या वतीने २० जुलै २०२६ पासून अमळनेर नगरपरिषद कार्यालयासमोर बेमुदत ‘अन्न त्याग आंदोलन’ सुरू करण्यात आले आहे.

संघटनेचे राज्याध्यक्ष नागोज मोहन कंडारे यांच्या उपस्थितीत सुरू झालेल्या या आंदोलनात किरण अनिल बेंडवाल, संदीप अर्जुन धाप, नरेंद्र गुरुप्रसाद ढोगळे, बरवा सुनील संगोळे आणि सिमरन यश लोहार हे उपोषणकर्ते सहभागी झाले आहेत.

संघटनेने प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शासन निर्णयानुसार पात्र लाभार्थ्यांना नियुक्ती देण्याचे स्पष्ट निर्देश असतानाही अमळनेर नगरपरिषद प्रशासनाने कोणतीही कार्यवाही केलेली नाही. त्यामुळे सफाई कर्मचारी आणि अनुसूचित जातीच्या लाभार्थ्यांवर अन्याय कायम असून, शासनाच्या आदेशांची अंमलबजावणी करण्यात संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी हलगर्जीपणा केल्याचा आरोप संघटनेने केला आहे. तसेच संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करून शासन निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करावी, अशी मागणी संघटनेने केली आहे. वारंवार पाठपुरावा करूनही कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्यामुळे अखेर बेमुदत अन्न त्याग आंदोलन सुरू करण्याचा निर्णय घ्यावा लागल्याचे संघटनेने स्पष्ट केले आहे.

या संदर्भातील निवेदनाची प्रत आयुक्त तथा संचालक, नगरपालिका प्रशासन संचालनालय, बेलापूर (मुंबई), जिल्हाधिकारी जळगाव, अमळनेर नगरपरिषदेचे अध्यक्ष तसेच अमळनेर पोलीस निरीक्षक यांनाही पाठविण्यात आली आहे. दरम्यान, प्रशासनाने तातडीने मागण्यांवर सकारात्मक निर्णय न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही अखिल महाराष्ट्र सफाईगार व चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *