
हे राम…! कचऱ्याच्या गाडीतून मृतदेह, अमरधामातील विटंबना, १० ते १२ दिवसांनी पाणी तेही दूषित ; अमळनेरकरांचा सन्मान नेमका कुठे हरवला?
जिवंतपणी दूषित पाणी… आणि मृत्यूनंतरही सन्मान नाही? नगरपरिषदेच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह?

“जब मौत के बाद भी सम्मान न मिले, तो अपनी ज़िंदगी जीकर क्या घंटा फ़ायदा?”
अमळनेर(प्रतिनिधी ) एखाद्या शहराची ओळख केवळ रस्ते, इमारती किंवा विकासकामांवरून होत नाही, तर तेथील प्रशासन जिवंत आणि मृत नागरिकांशी किती सन्मानाने वागते यावरूनही ठरते. मात्र अमळनेर शहरात गेल्या काही दिवसांत समोर आलेल्या घटनांनी नगरपरिषदेच्या संवेदनशीलतेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.
सर्वाधिक धक्कादायक बाब म्हणजे, शहराच्या हद्दीत मृतावस्थेत आढळलेल्या बेवारस प्रेताची शवविच्छेदनानंतर अंत्यसंस्कारासाठी स्वतंत्र वाहनातून विल्हेवाट लावण्याची कचरा संकलन करणाऱ्या ठेकेदाराला बंधनकारक असताना देखील आज रोजी एक बेवारस प्रेताची ग्रामीण रुग्णालयातून विल्हेवाट लावताना चक्क कचरा वाहणाऱ्या घंटागाडीतून वाहून नेण्यात आल्याचा असंवेदनशील प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून, मृत्यूनंतरही माणसाच्या सन्मानाची अशी पायमल्ली होत असेल तर ही केवळ प्रशासकीय अथवा ठेकेदाराची चूक नसून मानवतेलाच काळिमा फासणारी बाब असल्याची भावना व्यक्त होत आहे.
या घटनेपूर्वी देखील अमरधाम स्मशानभूमीतील विदारक वास्तवही समोर आले होते. प्रभाग क्रमांक ३ च्या नगरसेविका शोभाबाई गढरे, राष्ट्रवादी युवक चे शहर अध्यक्ष दुर्गेश पाटील (dp )यांनी केलेल्या आरोपांनुसार, अंत्यसंस्कारासाठी पुरेसे सरण (गौरी )उपलब्ध नसल्याने अनेक मृतदेह पूर्णपणे जळत नाहीत. परिणामी अर्धवट जळालेल्या अवशेषांची भटक्या कुत्र्यांकडून लचके तोडून विटंबना होत असल्याचे प्रकार वारंवार घडत होता. याशिवाय स्मशानभूमीत कायमस्वरूपी कर्मचारी नसल्याने दुःखाच्या प्रसंगी आलेल्या नातेवाईकांनाच सर्व व्यवस्था स्वतः करावी लागत असल्याची खंत नागरिकांनी व्यक्त केली होती.
दरम्यानच्या काळात, शहरातील पाणीपुरवठ्याबाबतही गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. उपनगराध्यक्ष प्रशांत निकम यांनी स्वतः जलकुंभात उतरून पाहणी केल्यानंतर गेल्या २२ ते २४ वर्षांपासून जलकुंभाची स्वच्छता झाली नसल्याचा दावा केला. टाक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचल्यामुळे शहरात दूषित पाणीपुरवठा होत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याशीही मोठा खेळ झाल्याचा आरोप होत आहे.
कुठे नेऊन ठेवलंय माझं अमळनेर…? माणूस जिवंत असो वा मृत… सन्मानाचीच वानवा!
या तीनही घटना एकत्र पाहिल्यास एक गंभीर चित्र समोर येते. जिवंत असताना नागरिकांना स्वच्छ पाणी मिळत नाही, मृत्यूनंतर सन्मानाने अंत्यसंस्काराची हमी नाही आणि स्मशानभूमीतही मूलभूत सुविधा नाहीत. त्यामुळे नगरपरिषदेच्या कार्यपद्धतीवर नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
नागरिकांना पडलेला प्रश्न आहे की शहराच्या विकासाच्या घोषणा करणारे प्रशासन माणसाच्या जगण्याचा आणि मृत्यूनंतरच्या सन्मानाचाही विचार करणार आहे का? मात्र, कचरा वाहणाऱ्या घंटागाडीतून मृतदेह नेल्याच्या घटनेबाबत संबंधित प्रशासनाने अधिकृत स्पष्टीकरण दिल्यास किंवा चौकशीत वेगळे निष्कर्ष समोर आल्यास तेही तितक्याच ठळकपणे जनतेसमोर मांडले जाणे आवश्यक आहे. अशा संवेदनशील प्रकरणात वस्तुस्थिती स्पष्ट करणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे.
“जिवंत असताना दूषित पाणी… मृत्यूनंतर कचऱ्याच्या घंटागाडीतून प्रवास… आणि अमरधामातही सन्मान नाही; मग अमळनेरकरांनी नगरपरिषदेकडून नेमकी कोणती माणुसकीची अपेक्षा ठेवायची?
“असंवेदनशील प्रकार अस्वीकार्य; संबंधित ठेकेदाराला नोटीस”
झालेला प्रकार हा असंवेदनशील असून कचरा संकलन करणाऱ्या ठेकेदाराला बेवारस प्रेताची विल्हेवाट लावण्यासाठी स्वतंत्र वाहनाची सोय करणे बंधनकारक असताना देखील संबंधित ठेकेदाराने अक्षम्य चूक केलेली असल्यामुळे त्याला नोटीस बजावून कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
गणेश शिंदे, मुख्याधिकारी, अमळनेर नगरपरिषद
“बेवारस मृतदेह प्रकरणी ठेकेदाराविरुद्ध कठोर कारवाईचे आदेश : नगराध्यक्ष”
बेवारस मृतदेहाची विल्हेवाट लावताना कचरा संकलन करणाऱ्या ठेकेदाराने केलेला प्रकार अत्यंत चुकीचा असून तो माणुसकीला काळीमा फासणारा आहे. या गंभीर प्रकरणात संबंधित ठेकेदाराची कोणतीही गय केली जाणार नाही. त्याला तात्काळ नोटीस बजावून त्याच्याविरुद्ध नियमानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
डॉ. परीक्षित बाविस्कर,लोकनियुक्त नगराध्यक्ष, अमळनेर नगरपरिषद

Leave a Reply