
फुले-आंबेडकर जयंती व कामगार दिनानिमित्त आज अमळनेरात ‘जाहीर प्रबोधन सभा’; सामाजिक परिवर्तनावर होणार मंथन
अमळनेर (प्रतिनिधी) राष्ट्रपिता महात्मा जोतिराव फुले आणि भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती महोत्सवाचे तसेच कामगार दिनाचे औचित्य साधत ऑल इंडिया एससी/एसटी रेल्वे एम्प्लॉइज असोसिएशन, अमळनेर शाखेतर्फे ‘जाहीर प्रबोधन सभे’चे आयोजन रविवार दि. ३ मे रोजी करण्यात आले आहे.
अमळनेर रेल्वे स्टेशन परिसरातील हॉलीबॉल ग्राउंडवर ही सभा सायंकाळी ६ वाजता पार पडणार असून, ‘सामाजिक परिवर्तनात कामगारांचे योगदान’ हा या कार्यक्रमाचा मुख्य विषय राहणार आहे.कार्यक्रमाचे उद्घाटन लेखिका व प्रशिक्षक दर्शना पवार यांच्या हस्ते होणार असून, अध्यक्षस्थानी मंडळ अध्यक्ष चंपाराम रेंगर विराजमान राहतील. प्रमुख वक्ते म्हणून प्रा. नितीन पाटील तसेच राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष प्रेमकुमार गेडाम हे मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी मंडळ सचिव विजय जगताप, कामगार कल्याण अधिकारी अनिल पी. आर., डॉ. विवेक अहिरे, राधेश्याम मीना, महेश पुरी गोस्वामी, लखनलाल मीना, दयाशंकर पिपरीया यांच्यासह रेल्वे विभागातील अनेक अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहणार आहेत. या प्रबोधन सभेमध्ये सामाजिक समता, कामगार हक्क, आणि परिवर्तनाच्या प्रक्रियेत कामगारांचे महत्त्व यावर सखोल चर्चा होणार असून, उपस्थितांना विचारप्रवर्तक मार्गदर्शन मिळणार आहे. आयोजकांनी अमळनेर व परिसरातील सर्व नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि कामगार बांधवांनी या सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी करण्याचे आवाहन केले आहे.

Leave a Reply