
अमळनेरात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा; ध्वजारोहण, राष्ट्रगीताने दुमदुमला परिसर
अमळनेर (प्रतिनिधी) महाराष्ट्र दिनानिमित्त येथील शासकीय कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीच्या वातावरणात पार पडला. माजी मंत्री तथा आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते सकाळी ८ वाजता ध्वजारोहण करण्यात आले.
ध्वजारोहणानंतर उपस्थितांनी ‘वंदे मातरम्’, राष्ट्रगीत आणि महाराष्ट्र राज्य गीत गायन करून राष्ट्राभिमान व्यक्त केला. संपूर्ण परिसर देशभक्तीच्या घोषणांनी दुमदुमला होता. या कार्यक्रमास उपविभागीय अधिकारी मयूर भंगाळे, तहसीलदार रुपेशकुमार सुराणा, नगरपालिकेचे मुख्याधिकारी गणेश शिंदे, उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक, पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, गटविकास अधिकारी एन. आर. पाटील, नायब तहसीलदार अजय कुलकर्णी तसेच निवडणूक नायब तहसीलदार प्रशांत धमके यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमात महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेचा इतिहास, राज्याच्या प्रगतीतील योगदान तसेच नागरिकांची जबाबदारी यावर मार्गदर्शन करण्यात आले. विविध शासकीय विभागांचे अधिकारी-कर्मचारी, राजकीय पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली. महाराष्ट्र दिनानिमित्त अमळनेर शहरात देशभक्तीचा उत्साह ओसंडून वाहत असल्याचे चित्र पाहायला मिळाले.

Leave a Reply