पाडळसरे ग्रामपंचायतीचा ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार’ आशाबाई पाटील व सुनीता भिल यांना प्रदान

अमळनेर (प्रतिनिधी) शासनाच्या निर्देशानुसार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त पाडळसरे ग्रामपंचायतीतर्फे गावातील उल्लेखनीय सामाजिक कार्य करणाऱ्या दोन कर्तबगार महिलांचा ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार’ देऊन गौरव करण्यात आला. यावर्षी हा प्रतिष्ठेचा पुरस्कार आशाबाई वसंतराव पाटील आणि  सुनीता अशोक भिल यांना प्रदान करण्यात आला.

ग्रामपंचायतीच्या मुख्य सभागृहात झालेल्या कार्यक्रमात सरपंच तथा प्रशासक शुभांगी पाटील आणि ग्रामसेवक सुभाष भोई यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि ५०१ रुपयांचा धनादेश देऊन दोन्ही महिलांचा सन्मान करण्यात आला.

सौ. आशाबाई वसंतराव पाटील यांनी चामुंडा माता शेतकरी गट व महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांना संघटित करून विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देत त्यांचे आर्थिक सक्षमीकरण करण्यासाठी उल्लेखनीय कार्य केले आहे. तसेच महिला बचत गट व शेतकरी महिला गट स्थापन करून महिलांच्या सबलीकरणासाठी त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे.

तर सुनीता अशोक भिल यांनी आदिवासी महिला म्हणून विविध सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून महिलांना आधुनिक शेतीविषयी मार्गदर्शन करून शेती क्षेत्रातील त्यांचे योगदान वाढविण्यासाठी उल्लेखनीय कार्य केले. त्यांच्या या कार्याची दखल घेत ग्रामपंचायत निवड समितीने दोघींची पुरस्कारासाठी निवड केली होती. कार्यक्रमास सरपंच शुभांगी पाटील, ग्रामसेवक सुभाष भोई, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भागवत पाटील, प्रगतिशील शेतकरी विकास पाटील, विकास सोसायटीचे सचिव रणछोड पाटील, माजी सरपंच सचिन पाटील, पत्रकार वसंतराव जिभाऊ पाटील, विश्वास कोळी, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे भूषण पाटील, माजी उपसरपंच प्रभाकर पाटील, भटू पाटील, हेमंत राठोड, भावना पाटील, कैलास कोळी तसेच सामाजिक कार्यकर्ते सागर कोळी यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन भागवत पाटील यांनी केले, तर आभार  सचिन पाटील यांनी मानले. कार्यक्रमाला महिला, युवक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *