घंटागाडीतून बेवारस मृतदेह वाहतूक प्रकरणी दुहेरी कारवाई; ठेकेदार, सुपरवायझर व चालकावर गुन्हा, स्वच्छता निरीक्षकावर शिस्तभंगाची कारवाई

अमळनेर (प्रतिनिधी) बेवारस मृतदेहाची कचरा संकलनासाठी वापरल्या जाणाऱ्या घंटागाडीतून वाहतूक केल्याच्या गाजलेल्या प्रकरणात अखेर पोलिस आणि नगरपरिषद प्रशासनाने दुहेरी कारवाईचा बडगा उगारला आहे. या प्रकरणात घनकचरा ठेकेदार, त्याचा सुपरवायझर आणि संबंधित घंटागाडी चालकाविरुद्ध अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, बेवारस मृतदेहांच्या विल्हेवाटीची जबाबदारी असलेले स्वच्छता निरीक्षक संतोष माणिक यांच्याविरुद्ध शिस्तभंग कारवाईचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, अमळनेर पोलीस ठाण्यात  भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ मधील कलम २२३ व ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नगरपरिषदेचे स्वच्छता निरीक्षक संतोष कन्हैया जाधव यांनी सरकारतर्फे दिलेल्या फिर्यादीवरून घनकचरा ठेकेदार रामदास बाळू पवार, सुपरवायझर राजेंद्र गोलाईत आणि संबंधित घंटागाडी चालकाविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. फिर्यादीनुसार, बेवारस मृतदेहाच्या अंत्यविधीसाठी स्वतंत्र वाहनाचा वापर करण्याच्या स्पष्ट लेखी सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, त्या आदेशाचे उल्लंघन करून २६ जून रोजी ग्रामीण रुग्णालयातील शवविच्छेदन कक्षातून बेवारस मृतदेह कचरा संकलनासाठी वापरल्या जाणाऱ्या एमएच-१९-सीएक्स-०६३४ क्रमांकाच्या घंटागाडीतून नेण्यात आला. नगरपरिषदेची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता हा प्रकार करण्यात आल्याचा आरोप संबंधितांवर ठेवण्यात आला आहे.

या घटनेनंतर मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी संबंधितांविरुद्ध तक्रार दाखल करण्याचे आदेश दिल्यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार विनोद लक्ष्मण सोनवणे करीत आहेत. दरम्यान, नगरपरिषद प्रशासनाने या प्रकरणाची अंतर्गत चौकशीही पूर्ण केली आहे. मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ३ फेब्रुवारी २०२६ च्या आदेशानुसार स्वच्छता निरीक्षक संतोष माणिक यांच्याकडे बेवारस मृतदेहांच्या विल्हेवाटीची जबाबदारी सोपविण्यात आली होती. मात्र, त्यांनी कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. त्यांनी सादर केलेला खुलासा असमाधानकारक ठरल्याने त्यांच्या विरोधातील शिस्तभंग कारवाईचा प्रस्ताव सहआयुक्त, नगरपालिका शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव यांच्याकडे पाठविण्यात आला आहे. बेवारस मृतदेहाला सन्मानाने अंत्यसंस्कार मिळावेत, यासाठी असलेल्या नियमांचे उल्लंघन झाल्याने हे प्रकरण राज्यभर चर्चेचा विषय ठरले होते. माध्यमांनी सातत्याने हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर आता फौजदारी गुन्हा आणि विभागीय कारवाई अशा दोन्ही स्तरांवर हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यामुळे या प्रकरणात आणखी काही जणांवर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त होत असून, पुढे कोणावर जबाबदारी निश्चित होते याकडे अमळनेरकरांचे लक्ष लागले आहे.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *