
एसटी भाडेवाढ व स्वच्छता अधिभाराविरोधात अमळनेर काँग्रेसचे आंदोलन
अमळनेर (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने केलेल्या बस भाडेवाढीचा तसेच ‘स्वच्छता अधिभार’ या नावाखाली आकारल्या जाणाऱ्या अतिरिक्त शुल्काचा निषेध करत अमळनेर तालुका काँग्रेस कमिटीतर्फे सोमवार दि. १३ जुलै रोजी अमळनेर बस आगारात आंदोलन करण्यात आले. यावेळी आगार व्यवस्थापक चौधरी यांना निवेदन देण्यात आले. तसेच बसस्थानक परिसरात प्रवाशांमध्ये जनजागृती करण्यासाठी घोषणाबाजी करण्यात आली.
तालुका काँग्रेस अध्यक्ष भागवत केशव सूर्यवंशी यांनी निवेदनाचा आशय उपस्थितांना समजावून सांगताना सांगितले की, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने अवघ्या सव्वा वर्षात २५ टक्क्यांहून अधिक भाडेवाढ करून सर्वसामान्य प्रवाशांवर आर्थिक अन्याय केला आहे. २४ जानेवारी २०२५ रोजी १४.९५ टक्के भाडेवाढ करण्यात आली होती. त्यानंतर १५ एप्रिल ते १५ जून २०२६ या कालावधीसाठी १० टक्के हंगामी भाडेवाढ लागू करण्यात आली. मात्र, संबंधित कालावधी संपल्यानंतरही ही वाढ कायम ठेवण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.
निवेदनात नमूद करण्यात आले की, १५ एप्रिल २०२६ पासून प्रत्येक प्रवाशाकडून ‘स्वच्छता अधिभार’ म्हणून दोन रुपये अतिरिक्त आकारले जात आहेत. अल्प अंतराचा किंवा दीर्घ अंतराचा प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांकडून हा समान अधिभार आकारला जात असून, ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवासाची सवलत असतानाही त्यांनाही हा अधिभार भरावा लागत असल्याने ही बाब अन्यायकारक असल्याचा काँग्रेसचा आरोप आहे. तेल कंपन्यांकडून महामंडळाला प्रतिलिटर ५ रुपये १३ पैशांची सवलत मिळत असतानाही त्याचा लाभ प्रवाशांना दिला जात नसल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला. तसेच दिवाळी, अक्षय तृतीया आणि उन्हाळी सुट्टीसारख्या गर्दीच्या काळात कोणतेही ठोस कारण नसताना विशेष भाडेवाढ करून प्रवाशांवर आर्थिक बोजा टाकला जात असल्याची टीका करण्यात आली. महामंडळाच्या तोट्याची कारणे शोधून अनावश्यक खर्च कमी करणे, अवास्तव सवलतींचा पुनर्विचार करणे अशा उपाययोजना करण्याऐवजी वारंवार भाडेवाढ करून त्याचा भार सर्वसामान्य प्रवाशांवर टाकला जात असल्याची टीका काँग्रेसने केली. अन्यायकारक भाडेवाढ आणि स्वच्छता अधिभार तातडीने रद्द करण्यात यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी महिला जिल्हाध्यक्ष सुलोचना वाघ, जिल्हा सरचिटणीस मनोज पाटील, जिल्हा सरचिटणीस संदीप घोरपडे, तालुका राष्ट्रसेवा दल अध्यक्ष बन्सीलाल भागवत, तालुका उपाध्यक्ष रामकृष्ण पाटील, काशिनाथ वना पाटील, दिलीप साहेबराव पाटील, पी. वाय. पाटील, माजी शहराध्यक्ष लोटन अण्णा चौधरी, तालुका सरचिटणीस सुधाकर भैसे, तालुका उपाध्यक्ष कन्हैयालाल कापडे, ॲड. रज्जाक शेख, मगन वामन पाटील, पार्थराज पवार, तालुका अल्पसंख्यांक अध्यक्ष राजू भाट, सईद तेली, शालिग्राम पाटील यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply