
मंगळग्रह मंदिराबाबतच्या कथित दिशाभूल प्रकरणी तक्रारींचा पाऊस; अनंत निकमविरुद्ध कठोर कारवाईची मागणी
अमळनेर (प्रतिनिधी) श्री मंगळग्रह मंदिर व श्री मंगळग्रह सेवा संस्थेबाबत सोशल मीडियावर कथित दिशाभूल करणारा व्हिडिओ व मजकूर प्रसारित केल्याच्या आरोपाप्रकरणी अनंत रमेश निकम यांच्याविरोधात अमळनेरमध्ये तक्रारींची मालिका सुरू झाली आहे. याप्रकरणी श्री मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले यांनी ११ जुलै रोजी अमळनेर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. त्यानंतर १३ जुलै रोजी सकल हिंदू समाज, विविध हिंदुत्ववादी संघटना, व्हॉईस ऑफ मीडिया (अमळनेर शाखा), मंगळग्रह सेवा संस्थेचे कर्मचारी आणि परिसरातील व्यावसायिक यांनी प्रांताधिकारी, पोलीस उपअधीक्षक आणि पोलीस निरीक्षक यांच्याकडे शेकडो सह्यांसह स्वतंत्र निवेदने सादर करून कठोर कायदेशीर कारवाईची मागणी केली. निवेदने देण्यासाठी प्रांताधिकारी कार्यालयात मोठी गर्दी झाली होती.
डॉ. महाले यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय, जळगाव येथे दाखल केलेला बदल अहवाल (Change Report) पुराव्याचे शपथपत्र सादर न झाल्यामुळे नामंजूर झाला असून त्याविरुद्ध अपील दाखल करण्यात आले आहे. मात्र, अपील प्रलंबित असतानाच अनंत निकम यांनी व्हॉट्सॲप व फेसबुकवर न्यायालयाच्या नावाचा उल्लेख करून “श्री मंगळग्रह मंदिरावर ताबा मिळविण्याचा बेकायदेशीर कट उधळला” आणि “खोट्या विश्वस्तांचा फेरफार अर्ज फेटाळला” अशा आशयाचा कथित दिशाभूल करणारा मजकूर व व्हिडिओ प्रसारित केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
फिर्यादीत पुढे नमूद करण्यात आले आहे की, संबंधित व्हिडिओमध्ये न्यायालयाच्या आदेशात नसलेल्या बाबींचा उल्लेख करून डॉ. महाले यांनी न्यायालयाची दिशाभूल केली, बनावट कागदपत्रे तयार केली, खोट्या स्वाक्षऱ्या केल्या आणि कोणताही कायदेशीर अधिकार नसताना अर्ज दाखल केला, असे आरोप करण्यात आले. हे सर्व आरोप न्यायालयाच्या आदेशात कुठेही नसून समाजात बदनामी करण्याच्या उद्देशाने खोटी माहिती प्रसारित करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.
याशिवाय सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयाच्या मुख्य जनसंपर्क अधिकारी व अधीक्षक यांच्या नावाने कथित प्रेसनोट तयार करून ती पत्रकार व सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. धर्मादाय विभागाच्या अधिकाऱ्यांकडे चौकशी केली असता अशा प्रकारचे कोणतेही अधिकृत प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आले नसल्याचे सांगण्यात आल्याचा उल्लेख फिर्यादीत आहे.
डॉ. महाले यांनी आपल्या तक्रारीत श्री मंगळग्रह मंदिर व सेवा संस्थेला शासनासह विविध प्रतिष्ठित संस्थांचे पुरस्कार मिळाल्याचे नमूद करत मंदिर हे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असल्याचे सांगितले आहे. कथित बदनामीमुळे मंदिराची प्रतिमा मलिन झाली असून भाविकांच्या भावना दुखावल्या गेल्या तसेच अनेकांच्या उपजीविकेवर परिणाम झाल्याचा दावा करण्यात आला आहे. अनंत निकम यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करून आवश्यक असल्यास हद्दपार करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
दरम्यान, डॉ. महाले यांनी जळगाव येथील धर्मादाय विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन तोंडी तक्रार केली असून मंगळवार, १४ जुलै रोजी सर्व पुराव्यांसह सविस्तर लेखी तक्रार दाखल करण्यात येणार असल्याची माहिती दिली. या संपूर्ण प्रकरणामुळे अमळनेरमध्ये चर्चेला उधाण आले असून पुढील कायदेशीर कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सकल हिंदू समाजाची भूमिका
सकल हिंदू समाज व विविध हिंदुत्ववादी संघटनांनी दिलेल्या निवेदनात हिंदू धर्म, मंदिरे आणि धार्मिक संस्थांबाबत सातत्याने बदनामीकारक मजकूर प्रसारित होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. अशा प्रकारांमुळे समाजात तेढ निर्माण होण्याची शक्यता असून तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
व्हॉईस ऑफ मीडियाचे निवेदन
व्हॉईस ऑफ मीडिया, अमळनेर शाखेने दिलेल्या निवेदनात डॉ. डिगंबर महाले यांच्या पत्रकारिता, सामाजिक व धार्मिक कार्याचा उल्लेख करून त्यांच्या तसेच श्री मंगळग्रह मंदिराच्या प्रतिमेला धक्का पोहोचविण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप केला आहे. न्यायालयाच्या नावाचा वापर करून कथित दिशाभूल करणारी माहिती प्रसारित करण्यात आल्याचा आरोप करत सोशल मीडियाच्या गैरवापरावर तातडीने प्रतिबंध घालण्याची मागणी करण्यात आली आहे.
कर्मचारी व व्यावसायिकांची निवेदन
मंगळग्रह सेवा संस्थेचे कर्मचारी व परिसरातील व्यावसायिकांनी दिलेल्या निवेदनात संस्थेच्या सामाजिक, शैक्षणिक, पर्यावरणविषयक व धार्मिक कार्यामुळे मंदिराची देश-विदेशात ओळख निर्माण झाल्याचे नमूद केले आहे. कथित बदनामीमुळे मंदिराच्या प्रतिमेवर परिणाम होत असून भाविकांकडून सातत्याने विचारणा होत असल्याने कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांवर मानसिक ताण निर्माण झाल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे.

Leave a Reply