
पशुधनाच्या शिकारीनंतर पाच दिवसांनी पिंजरा; सानेनगरात तरुणावर हल्ल्याच्या प्रयत्नानंतर वन विभागाची धावपळ
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील अंतुर्ली-रंजाणे परिसरातील नंदगाव शिवारालगत घुबड्या नाला भागात बिबट्याचा वावर वाढल्याने शेतकरी व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बिबट्याने गोऱ्हा व वासराला ठार केल्यानंतरही पिंजरा लावण्यास वन विभागाकडून पाच दिवस विलंब झाल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. ट्रॅप कॅमेऱ्यात बिबट्या कैद झाल्याचे सांगण्यात येत असतानाच गुरुवारी सानेनगरातील बोरी नदी परिसरात तरुणावर हल्ल्याचा प्रयत्न झाल्यानंतर वन विभागाने पिंजरा लावला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, रविवारी (दि. १३) पहाटे पाच ते साडेपाचच्या सुमारास घुबड्या नाला परिसरात बांधलेल्या जनावरांवर बिबट्याने हल्ला केला. सकाळी सातच्या सुमारास शेतकरी उमेश जानकीराम पारधी हे जनावरांना चारा-पाणी देण्यासाठी गेले असता त्यांना गोऱ्हा व वासरू मृतावस्थेत आढळून आले. त्यांनी तत्काळ वन विभागाला माहिती दिल्यानंतर वनपाल गुलाब पिंजारी, मनीषा मोरे व योगेश पाटील यांनी घटनास्थळी पाहणी करून पंचनामा केला. घटनास्थळी आढळलेल्या पावलांच्या ठशांवरून बिबट्याचा वावर असल्याचा प्राथमिक अंदाज वन विभागाने व्यक्त केला. दरम्यान, १० सप्टेंबर रोजी पोळ्याच्या दिवशीही याच परिसरात बिबट्या दिसल्याचे काही नागरिकांनी सांगितले होते. तसेच वन विभागाच्या ट्रॅप कॅमेऱ्यात बिबट्या कैद झाल्याचे सांगण्यात येत आहे. पशुधनावर हल्ला होऊनही पिंजरा लावण्यात न आल्याने शेतकरी व ग्रामस्थांमध्ये नाराजी होती. अखेर गुरुवारी (दि. १७) सकाळी ११ वाजता सानेनगरातील बोरी नदी परिसरात योगेश मनोज पाटील (वय २३) या तरुणावर बिबट्याने हल्ल्याचा प्रयत्न केल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. योगेश मनोज पाटील यांनी प्रसंगावधान राखून आरडाओरड केल्याने त्यांचा बचाव झाला. या घटनेनंतर वन विभागाने पारोळा येथून पिंजरा आणून गुरुवारी सायंकाळी सानेनगरातील बोरी नदी परिसरात, तरुणावर हल्ल्याचा प्रयत्न झालेल्या ठिकाणीच पिंजरा लावला. पशुधनावर हल्ला, ट्रॅप कॅमेऱ्यात बिबट्याचे चित्रीकरण आणि त्यानंतरही पाच दिवस पिंजरा न लावता हल्ल्याच्या प्रयत्नानंतरच पिंजरा का लावण्यात आला, असा सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे. बिबट्याचा वावर मानवी वस्तीजवळ पोहोचलेला असताना प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी हल्ल्याची घटना घडण्याची प्रतीक्षा केली जात होती का, असा प्रश्नही ग्रामस्थ उपस्थित करत आहेत. वन विभागाने परिसरात अतिरिक्त ट्रॅप कॅमेरे बसवावेत, गस्त वाढवावी आणि बिबट्याच्या हालचालींवर सातत्याने लक्ष ठेवावे, अशी मागणी शेतकरी व ग्रामस्थांनी केली आहे. तसेच पशुधनावर हल्ला झाल्यानंतर पिंजरा लावण्यास झालेल्या विलंबाची चौकशी करून आवश्यक कार्यवाही करावी, अशीही मागणी होत आहे.
बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवून
घुबड्या नाला परिसरात बिबट्याचा वावर असल्याची माहिती मिळाल्यानंतर वन विभागाने पाहणी करून पंचनामा केला आहे. बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले असून, ग्रामस्थांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने गुरुवारी संध्याकाळी सानेनगरातील बोरी नदी परिसरात पिंजरा लावण्यात आला आहे. वन विभागाचे कर्मचारी बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवून असून ग्रामस्थांनी सतर्क राहावे आणि बिबट्या दिसल्यास तातडीने वन विभागाला माहिती द्यावी. –छत्रपती चव्हाण, वनपरिक्षेत्र अधिकारी, वन विभाग, पारोळा

Leave a Reply