पाडळसरे धरणावरील २४x७ पाणीपुरवठा योजनेला वेग; आमदार अनिल पाटील यांची पाहणी

विकासासाठी आमदार-नगराध्यक्ष एकत्र; १९४.५४ कोटींच्या योजनेचे काम प्रगतिपथावर

 

अमळनेर (प्रतिनिधी) शहरातील पाणीटंचाई कायमस्वरूपी दूर करण्यासाठी मंजूर करण्यात आलेल्या पाडळसरे धरणावरील १९४.५४ कोटींच्या २४x७ पाणीपुरवठा योजनेचे काम वेगाने सुरू असून, रविवारी दि. २४ मे रोजी माजी मंत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील यांनी प्रत्यक्ष स्थळी भेट देऊन कामाची पाहणी केली. यावेळी लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर यांनीही नगरसेवकांसह उपस्थिती लावत शहर विकासासाठी एकत्रित भूमिका असल्याचे संकेत दिले.

आमदार अनिल पाटील सकाळी ७.३० वाजता शहर विकास आघाडीचे नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह पाडळसरे धरण परिसरात दाखल झाले. तापी नदीकाठी सुरू असलेल्या विविध कामांची त्यांनी पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. नगराध्यक्ष डॉ. बाविस्कर यांनीही तांत्रिक बाबींची माहिती जाणून घेत काही सूचना केल्या. योजनेअंतर्गत १ इंटेकवेल, ३ इन्फेक्शन वेल, १ जॅकवेल आणि कनेक्टिंग मेनचे काम सुरू असून ते २० टक्क्यांपेक्षा अधिक पूर्ण झाले आहे. आमदारांनी कामाला अधिक गती देण्याच्या सूचना संबंधित यंत्रणेला दिल्या. यावेळी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी गणेश शिंदे, अभियंता बैसाणे, मानव सेवा कन्सल्टंट धुळेचे राजेंद्र सोनार व विवेक पाटील, ठेकेदार जितेश ठाकरे व राज राठोड उपस्थित होते. त्यांनी कामाच्या प्रगतीचा सविस्तर आढावा सादर केला. कामाची प्रगती समाधानकारक असल्याची भावना नगराध्यक्ष, नगरसेवक व उपस्थित पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. पाणीटंचाईवर कायमस्वरूपी उपायाची अपेक्षा

यंदाच्या उन्हाळ्यात अमळनेरकरांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागला होता. त्यामुळे ही योजना लवकर पूर्ण व्हावी, यासाठी आमदार अनिल पाटील सातत्याने पाठपुरावा करत असून, त्याच पार्श्वभूमीवर हा विशेष पाहणी दौरा आयोजित करण्यात आला होता. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष, ग्रामीण व शहर पदाधिकारी, नगरसेवक, नगरसेविका, कार्यकर्ते व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

९२ किमी पाइपलाईन पूर्ण

 

दोन वर्षांपूर्वी आमदार अनिल पाटील यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेली ही योजना अमळनेर शहरासाठी महत्त्वाची मानली जात आहे. पाडळसरे धरणावर वर्षभर जलसाठा उपलब्ध राहत असल्याने ही योजना शहरासाठी ‘जलरक्षक’ ठरणार आहे. योजनेचे आतापर्यंत जवळपास ३५ टक्के काम पूर्ण झाले असून, शहरात २११.५ किलोमीटरपैकी ९२ किलो मीटरपेक्षा अधिक पाइपलाईन टाकण्यात आली आहे. ढेकू रोडवरील नवनाथ टेकडी येथे २८ एमएलटी क्षमतेचे जलशुद्धीकरण केंद्र उभारण्याचे काम ४० टक्के पूर्ण झाले आहे. तसेच १८.६० लाख लिटर व १९.५८ लाख लिटर क्षमतेच्या जलकुंभांचे बांधकामही सुरू आहे. या योजनेत सौर ऊर्जा प्रकल्पाची तरतूद असल्याने भविष्यात वीज बिलात मोठी बचत होणार असल्याचे सांगण्यात आले.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *