
प्रताप महाविद्यालयात ‘वन महोत्सव’ उत्साहात; वृक्षारोपणातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश
अमळनेर (प्रतिनिधी) येथील प्रताप महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना (रा.से.यो.) एककाच्या वतीने ७ जुलै रोजी ‘वन महोत्सव’ उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमातून पर्यावरण संरक्षणासाठी वृक्षलागवड आणि वृक्षसंवर्धनाची गरज अधोरेखित करण्यात आली.
महाराष्ट्र शासन व विद्यापीठाच्या निर्देशानुसार १ ते ७ जुलै २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या वन महोत्सवांतर्गत महाविद्यालय परिसरात वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. एच. डी. जाधव आणि कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगावचे सिनेट सदस्य प्रा. डॉ. संदीप बी. नेरकर यांच्या हस्ते महाविद्यालयाच्या प्रांगणात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी प्रभारी प्राचार्य डॉ. एच. डी. जाधव यांनी, “एक झाड लावा, हजारो जीव वाचवा. झाडे आपल्याला प्राणवायू, सावली, अन्न आणि स्वच्छ पर्यावरण देतात. आज आपण लावलेले छोटे रोप उद्या मोठे वृक्ष बनून पुढील पिढ्यांसाठी अमूल्य ठेवा ठरेल,” असे सांगत प्रत्येकाने वृक्षारोपणासोबत वृक्षसंवर्धनाची जबाबदारीही स्वीकारावी, असे आवाहन केले. सिनेट सदस्य प्रा. डॉ. संदीप बी. नेरकर यांनी प्रत्येक नागरिकाने किमान एक झाड लावून त्याचे संगोपन करण्याचा संकल्प करावा, असे आवाहन केले. वृक्षलागवड आणि वृक्षसंवर्धनाच्या माध्यमातून हिरवेगार, प्रदूषणमुक्त भारत घडविण्यासाठी सर्वांनी योगदान द्यावे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. या कार्यक्रमाला उपप्राचार्य डॉ. विजय मांटे, डॉ. योगेश तोरवणे, प्राध्यापक डॉ. कैलास निळे, डॉ. एस. डी. बागुल, डॉ. हेमंत पवार, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. सुनिल राजपूत, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी डॉ. जयेश साळवे, महिला कार्यक्रम अधिकारी डॉ. वैशाली राठोड, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक तसेच महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply