
कळमसरे-शहापूर रस्त्यावर सूचना फलक लावले नसल्याने अपघाताचा धोका वाढला
अमळनेर ( प्रतिनिधी) तालुक्यातील कळमसरे -शहापूर रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. या रस्त्यावर मात्र सूचना फलक नसल्याने रात्रीच्या वेळेस अपघात होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्यामुळे प्रवाशांचा जीव धोक्यात आला असून तातडीने सूचना फलक लावण्यात यावेत, अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की अमळनेर तालुक्यातील कळमसरे -शहापूर रस्त्याच्या कामाला सुमारे चार कोटींचा निधी मंजूर असून रस्त्याचे रुंदीकरणाचे काम सुरु आहे. त्यातही माती मिश्रित बारीक खडीचा वापर करून खडी दाबली जात आहे. त्यातच शहापूर -कळमसरे या पाच किलोमीटर अंतराच्या रस्त्यावर जवळपास दहा ठिकाणी लहान फरशी पुलाचे कामे होणार असल्याने सध्यस्थीतीत फरशी पुलासाठी रस्ता मध्यभागी कोरला गेला आहे. तर वापरण्यासाठी बाजूलाच पर्यायी रस्ता तयार करण्यात आला असला मात्र रात्रीच्या वेळी वाहनचालकाला याचा अंदाज न आल्यास अपघाताची शक्यता नाकारता येणार नाही. फरशी पुलासाठी रस्त्यावर खोदकाम केले असल्याने संबंधित ठेकेदाराने सूचना फलक लावणे गरजेचे असताना याबाबत मात्र ठेकेदाराचा निष्काळजी पणा दिसून येत आहे. मात्र संबंधित अधिकाऱ्यांनी याबाबत लक्ष घालावे अशीही वाहनचालकांकडून सांगितले जात आहे.
निकृष्ट दर्जाचे काम होत असल्याचा आरोप
नेहमीच दुर्लक्षित असणारा या रस्त्याला माजी मंत्री अनिल पाटील यांनी मागील पंचवार्षिक काळातच सुमारे चार कोटी रुपयांचा निधी मिळवून दिला आहे. रस्त्याची गुणवत्ता टिकून राहावी यासाठी कळमसरे, शहापूर येथील ग्रामस्थांचे लक्ष असून कामात गुणवत्ता नसल्यास रस्त्याचे काम बंद करण्यात येईल, असाही इशारा देण्यात आला असून रस्त्याच्या कामाबाबत संबंधित अधिकारी यांनी लक्ष घालावे असेही म्हटले जात आहे.

Leave a Reply