दोन मोटरसायकलची समोरासमोर धडक; निमझरी येथील तरुण जागीच ठार

अमळनेर (प्रतिनिधी)  दोन मोटरसायकलची समोरासमोर जोरदार धडक होऊन निमझरी येथील ३५ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना २२ रोजी दुपारी साडे चार वाजेच्या सुमारास ढेकू रस्त्यावर माऊली पॉलिटेक्निक जवळ घडली. याप्रकरणी पोलिसात नोंद करण्यात आले आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, निमझरी येथील शांताराम दशरथ भिल (वय ३५) हे आपल्या मोटरसायकल (क्रमांक एमएच १९ आर ७७४९) वरून जात असताना समोरून येणारी मोटरसायकल (क्रमांक एमएच १९ डीएच ११४३) वरील चालक विशाल सुखदेव भामरे (रा. जवखेडा) हा रॉंग साईडने भरधाव वेगात येऊन शांताराम भिल यांच्या मोटरसायकलला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की शांताराम भिल यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह पुढील कार्यवाहीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविला. या प्रकरणी मयताचे भाऊ विनोद दशरथ भिल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अमळनेर पोलीस स्टेशनला चालक विशाल भामरे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १०६(१), २८१, १२५(अ), १२५(ब) तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हेडकॉन्स्टेबल काशिनाथ पाटील करीत आहेत.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *