अमळनेरच्या शंतनू वाघमारे यांचा जागतिक मंचावर ठसा; हवामान बदलावर स्थानिक आवाज पोहोचवला

अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर येथील शंतनू वाघमारे यांनी अलीकडेच ग्लोबल सिटिझन असेंब्ली (जीसीए) या आंतरराष्ट्रीय उपक्रमात सहभाग घेत स्थानिक पातळीवरील अनुभव जागतिक स्तरावर प्रभावीपणे मांडले. जानेवारी ते मार्च या कालावधीत पार पडलेल्या या कार्यक्रमात जगभरातील प्रतिनिधींनी हवामान बदल व अन्न व्यवस्थेवरील महत्त्वाच्या विषयांवर चर्चा केली.

आधार या संस्थाच्या सहकार्याने शंतनूंनी या मंचावर सहभाग घेतला. संस्थेने कागदपत्रांची पूर्तता, समन्वय आणि स्थानिक माहिती उपलब्ध करून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. शंतनूंनी गावांमध्ये आणि छोट्या शहरांमध्ये जाणवणारे हवामान बदलाचे परिणाम, जसे की वाढती उष्णता, बदलते ऋतू, यांचे वास्तव चित्रण जागतिक पातळीवर मांडले. या चर्चांमध्ये शंतनूंनी केवळ भाषांतराची भूमिका निभावली नाही, तर स्थानिक लोकांचे अनुभव अचूक आणि प्रभावीपणे मांडण्याचे कामही केले. विशेष म्हणजे, स्थानिक रिक्षाचालक किशोर पाटील यांनी आपल्या दैनंदिन जीवनावर हवामान बदलाचा होणारा परिणाम स्पष्ट केला. शंतनूंनी त्यांचे विचार जगासमोर पोहोचवले, ज्यामुळे सामान्य नागरिकांचाही आवाज या चर्चेत ऐकू गेला. “किशोरसारख्या लोकांचे आवाज जगापर्यंत पोहोचले पाहिजेत. हवामान बदलाचा परिणाम रोजच्या आयुष्यावर कसा होतो, हे फक्त आकड्यांमधून किंवा कागदावरून पूर्णपणे समजत नाही,” असे शंतनू वाघमारे यांनी सांगितले. या सत्रांमध्ये अन्न व्यवस्था आणि शेती यांचा हवामान बदलाशी असलेला संबंध यावरही सखोल चर्चा झाली. यावेळी किशोर पाटील म्हणाले, “आम्ही मोठ्या शब्दांत बोलत नाही, पण बदल दिसतो.  ऋतू बदलले आहेत, उष्णता वाढली आहे आणि त्याचा आमच्या कामावर परिणाम होत आहे.” शंतनू वाघमारे यांचा हा सहभाग अमळनेरसारख्या ठिकाणांतील सामान्य नागरिकही जागतिक चर्चांमध्ये आपला प्रभावी आवाज पोहोचवू शकतात, याचे उत्तम उदाहरण ठरत आहे.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *