रामेश्वर खुर्दमध्ये पिण्याच्या पाण्याचा तीव्र प्रश्न; नागरिकांचा आक्रोश

अमळनेर (प्रतिनिधी )रामेश्वर खुर्द  गावात गेल्या एक वर्षांपासून पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली असून नागरिकांना स्वच्छ पाणी मिळत नसल्याने संतापाची लाट उसळली आहे. काही ठिकाणी पाणीपुरवठा होत असला तरी पाईपलाईनच्या कनेक्शनना योग्य प्रकारे बूच लावण्यात आलेले नसल्यामुळे गढूळ व दूषित पाणी थेट घरगुती नळांमध्ये येत आहे.

स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, या पाण्यातून जिवंत व मृत कीटक, सडलेले घटक येत असल्याने आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला असून लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि महिला यांना विशेष त्रास सहन करावा लागत आहे.

या गंभीर समस्येबाबत ग्रामपंचायत तसेच पाणीपुरवठा विभागाच्या अभियंत्यांकडे वारंवार निवेदने देऊनही कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नाही. प्रशासनाच्या या दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

“आम्ही अनेक वेळा तक्रारी केल्या, निवेदने दिली; मात्र अद्यापही परिस्थितीत कोणताही बदल झालेला नाही. प्रशासन जिवंत आहे की नाही, असा प्रश्न पडत आहे,” अशी संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केली.

गावातील पाणीपुरवठा व्यवस्था तातडीने दुरुस्त करून स्वच्छ व सुरक्षित पाणी उपलब्ध करून द्यावे, तसेच संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. अन्यथा आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *