
१५ मेपूर्वी स्व जनगणना करा; १६ पासून घरोघरी प्रगणकांची भेट
नागरिकांनी राष्ट्रीय कार्यात सहभागी होण्याचे प्रशासनाचे आवाहन
अमळनेर (प्रतिनिधी) राष्ट्रीय जनगणना प्रक्रिया १५ मेपासून सुरू होत असून या महत्त्वाच्या राष्ट्रीय कार्यात प्रत्येक नागरिकाने सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन उपविभागीय अधिकारी , तहसीलदार व मुख्याधिकारी यांनी संयुक्तरित्या केले आहे. नागरिकांनी १५ मेपूर्वी स्व जनगणना पूर्ण करून प्रशासनास सहकार्य करावे, असेही त्यांनी म्हटले आहे.
स्व जनगणना प्रक्रियेत नागरिकांची प्राथमिक माहिती नोंदवून त्यांचा स्वतंत्र आयडी तयार केला जातो. त्यामुळे प्रत्यक्ष जनगणना करताना प्रगणकांना काम करणे सोपे होते तसेच माहितीतील चुका टाळण्यास मदत होते. नागरिकांनी स्वतः माहिती भरल्याने माहिती अधिक अचूक व विश्वासार्ह राहते आणि वेळेचीही बचत होते. नागरिकांनी आपल्या मोबाईलवरून स्व जनगणना पोर्टल ही लिंक उघडून ओटीपीच्या माध्यमातून लॉगिन करावे. त्यानंतर क्रमाक्रमाने आवश्यक माहिती भरता येणार असून प्रक्रिया पूर्ण झाल्यावर नागरिकांना मेल व मेसेजद्वारे जनगणना आयडी प्राप्त होईल. प्रगणक घरी आल्यानंतर हा आयडी त्यांना दाखवावा, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. स्व जनगणनेसाठी अवघे दोन दिवस शिल्लक असल्याने नागरिकांनी तत्परतेने या राष्ट्रीय कार्यात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, अमळनेर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीत सभापती , सचिव व डी. ए. धनगर यांच्या सहकार्याने कर्मचाऱ्यांना स्व जनगणनेची माहिती देऊन जनगणना प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. नागरिकांनी प्रगणकांना आवश्यक माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहन उपविभागीय अधिकारी , तहसीलदार , मुख्याधिकारी तसेच उपमुख्याधिकारी यांनी केले आहे.
१६ मेपासून घरोघरी जनगणना
१६ मेपासून प्रत्यक्ष घरोघरी जाऊन जनगणना करण्यात येणार असून नागरिकांना एकूण ३४ प्रश्न विचारले जाणार आहेत. ग्रामीण भागात तहसील प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली ३३७ प्रगणक काम करणार असून त्यांच्या कामावर ५० सुपरवायझर नियंत्रण ठेवतील. तर शहरी भागात नगरपालिकेच्या मार्गदर्शनाखाली १९४ प्रगणक नियुक्त करण्यात आले असून ते प्रत्येक प्रभागातील घरोघरी भेट देणार आहेत. त्यांच्या कामावर ३२ सुपरवायझर नियंत्रण ठेवणार आहेत.

Leave a Reply