मुलीचे नाव घेण्यावरून दोन गटांत राडा; धारदार शस्त्र, दगडाने हल्ला, परस्पर १४ जणांविरुद्ध गुन्हे दाखल

अमळनेर (प्रतिनिधी) मुलीचे नाव घेण्याच्या कारणावरून अमळनेर शहरात दोन गटांत वाद होऊन हाणामारी झाल्याची घटना ७ ऑगस्ट रोजी दुपारी सुमन केमिस्ट्री क्लासेसजवळ तसेच ८० फुटी रस्त्यावरील नायरा पेट्रोल पंपाजवळ घडली. या प्रकारात दगड आणि धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आल्याने दोन्ही गटांतील काही जण जखमी झाले. या प्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात दोन्ही गटांतील एकूण १४ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, पहिल्या गटातर्फे चेतन शिवाजी देसले, रा. सार्वजनिक बांधकाम विभागासमोर, ढेकू रोड, यांनी फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीनुसार, नमन नीळकंठ पाटील आणि गौरव अशोक बोरसे यांनी त्यांना ८० फुटी रस्त्यावरील नायरा पेट्रोल पंपाजवळ बोलावून घेतले. त्यावेळी तेथे धवल राजा राजपूत, वेदांत पाटील, युवराज संगेले, तुषार माने, गौरव अशोक बोरसे, हसनेन (पूर्ण नाव माहीत नाही), साद पिंजारी, सुमित योगेश राजपूत आणि लोकेश राजपूत हे उपस्थित होते. फिर्यादीनुसार, ‘तू मुलीचे नाव का घेतो, तू दादा झाला आहे का?’ असे म्हणत संबंधितांनी चेतन देसले यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करून खाली पाडले. त्यानंतर मोटारसायकलवर बसवून त्यांना सुमन केमिस्ट्री क्लासेसजवळ सोडण्यात आले. तेथे पुन्हा सर्वजण आले आणि चेतन देसले यांना हात-पाय जोडायला लावून मोबाईलमध्ये ‘सॉरी’ म्हणतानाचा व्हिडिओ तयार केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

याचवेळी सुमित योगेश राजपूत आणि लोकेश राजपूत यांनी डोक्यात दगड मारून जखमी केल्याचा आरोप आहे. तसेच ‘आम्ही जेलमधून सुटून आलो आहोत, गाडीत चाकू घालून मारून टाकू’, अशी धमकी दिल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे.

या फिर्यादीवरून पोलिसांनी संबंधितांविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील कलम ११८(१), १८९(२), ११५(२), ३५१(२), ३५२, १९०, १९१(१) आणि १९१(२) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. तपास हेडकॉन्स्टेबल विनोद भोई करीत आहेत.

 

दुसऱ्या गटाचीही पोलिसांत फिर्याद

 

दरम्यान, दुसऱ्या गटातर्फे लोकेश योगेश राजपूत, रा. परांजपे चाळ, स्टेशन रोड, यांनी फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीनुसार, त्यांचा लहान भाऊ धवल हा सुमन केमिस्ट्री क्लासेसजवळ उभा असताना राजपाल देसले, रा. त्रिकोणी बगीचा, चेतन देसले, जयपाल देसले, वाल्मिक देसले आणि दिनेश देसले, सर्व रा. ढेकू रोड, सार्वजनिक बांधकाम विभागासमोर, यांनी धवल याला मारहाण केली. यावेळी राजपाल देसले यांनी लोकेश राजपूत यांना मागून पकडून ठेवले. त्यानंतर चेतन देसले यांनी धारदार शस्त्र जयपाल देसले यांच्या हातात दिले आणि जयपाल यांनी कानाजवळ वार केल्याचा आरोप आहे. दिनेश देसले यांनी डाव्या डोळ्यावर बुक्क्याने मारहाण केली, तर वाल्मिक देसले यांनी धारदार शस्त्राने डाव्या दंडावर वार करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

लोकेश योगेश राजपूत यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी कलम ११८(१), १८९(२), १९०, १९१(१), १९१(२), ११५(२), ३५१(२) आणि ३५२ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास हेडकॉन्स्टेबल अशोक साळुंखे करीत आहेत.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *