
स्मशानभूमीत ५० हून अधिक देशी वृक्षांची लागवड; तासखेडेकरांचा हिरवाईचा संकल्प!
अमळनेर (प्रतिनिधी) स्मशानभूमी म्हणजे केवळ दुःखाची जागा न राहता ती स्वच्छ, सुंदर आणि हिरवीगार व्हावी, या संकल्पनेतून तासखेडा येथे स्मशानभूमी परिसरात ५० हून अधिक देशी वृक्षांची लागवड करण्यात आली. ग्रामस्थ, तरुण मंडळ आणि ग्रामपंचायतीच्या पुढाकारातून राबविण्यात आलेल्या या उपक्रमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.
माजी जिल्हा परिषद सदस्य तथा नगरसेविका जयश्री पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण करून उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. माजी सरपंच प्रदीप पाटील, सरपंच कल्पना पाटील, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ आणि तरुण मंडळाच्या पुढाकारातून वड, पिंपळ, कडुलिंब, आंबा, जांभूळ, बेल आदी देशी वृक्षांची रोपे लावण्यात आली. झाडांना पाणी देण्यासाठी रावसाहेब पाटील आणि ए. के. पाटील यांनी पाण्याच्या टाक्या उपलब्ध करून दिल्या. प्रत्येक झाडाला ट्री गार्ड लावण्यासह त्यांचे संगोपन आणि नियमित पाणी देण्याची जबाबदारीही ग्रामस्थांनी स्वीकारली. “स्मशानभूमी म्हणजे फक्त दुःखाची जागा नाही, तर ती शांत, स्वच्छ आणि हिरवीगार असावी. आपल्या पूर्वजांच्या स्मरणार्थ लावलेले एक झाड पुढच्या पिढीसाठी ऑक्सिजन देईल,” अशी भावना यावेळी ग्रामस्थांनी व्यक्त केली. या उपक्रमात महिला, ज्येष्ठ नागरिक आणि शाळेतील विद्यार्थ्यांनीही मोठ्या संख्येने सहभाग घेतला. स्मशानभूमी परिसराची स्वच्छता, झाडांसाठी खड्डे खोदणे आदी कामे ग्रामस्थांनी श्रमदानातून केली. भविष्यात स्मशानभूमीला कुंपण घालणे आणि नागरिकांसाठी बसण्याकरिता बाके बसविण्याचाही संकल्प यावेळी करण्यात आला.
याप्रसंगी दिलीप बहिरम, संतोष बहिरम, सुनील पाटील, अभिमन पाटील, गुलाब पाटील, नागेश सोनार, मच्छिंद्र पाटील, निंबा पाटील, नाना पाटील, भारत पाटील, अनिल शिंदे, अनिल पाटील, बारकू पाटील, प्रमोद पाटील, आमोदे येथील भिवराव पाटील, संजय पाटील आणि ग्रामविकास अधिकारी आधार धनगर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

Leave a Reply