
गांधी जयंतीनिमित्त पिंपळे बु. येथे स्वच्छता अभियान; विद्यार्थ्यांनी दिला ‘स्वच्छ गाव, सुंदर गाव’चा संदेश
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील पिंपळे बु. ग्रामविकास मंडळ, नवलनगरच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून कै. सु. आ. पाटील माध्यमिक विद्यालय, पिंपळे बु. यांच्या वतीने गावात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते युवराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम उत्साहात पार पडला.
या अभियानात विद्यालयाचे मुख्याध्यापक बी. आर. पाटील, ज्येष्ठ शिक्षक डी. बी. पाटील, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी गावातील रस्ते, सार्वजनिक ठिकाणे व परिसराची स्वच्छता करून नागरिकांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले.
यावेळी “स्वच्छ गाव, सुंदर गाव” हा संदेश देत ग्रामस्थांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यात आली. सार्वजनिक परिसर स्वच्छ ठेवणे, कचरा योग्य ठिकाणी टाकणे तसेच स्वच्छतेची सवय अंगीकारण्याचे आवाहन करण्यात आले. महात्मा गांधी यांनी दिलेल्या स्वच्छता व स्वच्छ भारताच्या संदेशाचे स्मरण करून विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष कृतीतून स्वच्छतेचा संदेश दिला. विद्यालयाच्या या उपक्रमाचे ग्रामस्थांकडून कौतुक करण्यात आले.

Leave a Reply