
एमपीएससी विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर मुख्यमंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद
अमळनेरच्या रेणुकाताई पाटील यांनी मांडला विद्यार्थ्यांचा आवाज

अमळनेर (प्रतिनिधी) महाराष्ट्र लोकसेवा आयोग व इतर स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांच्या विविध मागण्या आणि समस्यांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत ३० सप्टेंबर रोजी ‘वर्षा’ निवासस्थानी विद्यार्थी प्रतिनिधींची सविस्तर बैठक झाली. या बैठकीत विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांवर चर्चा झाली असून, एमपीएससी परीक्षा ऑफलाइन पद्धतीने सुरू ठेवणे, एमपीएससी सचिवांची बदली आणि गट-कच्या जागांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ करण्यासह विविध मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घेण्यात आली.
या बैठकीपूर्वी जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील उदयनगर येथील विद्यार्थी प्रतिनिधी रेणुकाताई पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या २० प्रमुख मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादर केले. त्यानंतर झालेल्या बैठकीत रेणुकाताई पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या विविध मागण्या मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्या. त्या विद्यार्थी शिष्टमंडळातील एकमेव महिला प्रतिनिधी होत्या. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या अडचणी, परीक्षा प्रक्रियेतील पारदर्शकता, भरती प्रक्रिया, परीक्षा पद्धती, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क तसेच विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित विविध प्रश्न त्यांनी निदर्शनास आणून दिले.
रेणुकाताई पाटील यांनी सादर केलेल्या निवेदनात कथित पेपरफुटी प्रकरणाची निष्पक्ष व सखोल चौकशी, ७० हजार पदांची भरती प्रक्रिया सुरू करणे, एमपीएससीच्या सर्व परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेणे, गट-अ व गट-बच्या जागांमध्ये वाढ करणे, परीक्षा शुल्काबाबत सवलत, वयोमर्यादेत सवलत, एमपीएससीची पुनर्रचना, संघ लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर वार्षिक परीक्षा वेळापत्रक, तक्रार निवारण कक्षाची स्थापना, महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा कायदा-२०२४ची प्रभावी अंमलबजावणी, प्रश्नपत्रिका निर्मिती, छपाई, वाहतूक व वितरण प्रक्रिया अधिक सुरक्षित करणे, एकदाच परीक्षा शुल्क भरण्याची सुविधा, व्ही. राधा समितीचा अहवाल जाहीर करणे तसेच संपूर्ण परीक्षा प्रक्रियेत डिजिटल नोंदवही आणि स्वतंत्र गुणवत्ता नियंत्रण यंत्रणा निर्माण करण्यासह विविध मागण्यांचा समावेश होता.
बैठकीत विद्यार्थ्यांचे म्हणणे सविस्तरपणे ऐकून घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका व्यक्त केली. एमपीएससी सचिवांची बदली, परीक्षा ऑफलाइन पद्धतीने कायम ठेवणे, गट-कच्या जागांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ करणे आणि पुढील तीन वर्षांच्या रिक्त जागांचे नियोजन करण्याबाबत आश्वासन देण्यात आले. एमपीएससीच्या विद्यमान व माजी अध्यक्ष व सदस्यांच्या कार्यपद्धतीबाबत न्यायालयीन चौकशी करण्याचाही निर्णय जाहीर करण्यात आला आहे.
‘विद्यार्थ्यांच्या मेहनतीला न्याय मिळावा’
“पारदर्शक आणि विश्वासार्ह कार्यपद्धती हा लोकसेवा आयोगाचा दागिना आहे. मात्र, पेपरफुटीच्या प्रकरणासह विविध प्रश्नांमुळे प्रामाणिकपणे तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये परीक्षा व्यवस्थेबाबत चिंता निर्माण झाली होती. त्यामुळे आज विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे विद्यार्थ्यांच्या २० प्रमुख मागण्यांचे निवेदन सादर केले.
यानंतर मुख्यमंत्री महोदयांसोबत ‘वर्षा’ निवासस्थानी झालेल्या बैठकीत विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्या सविस्तरपणे मांडण्याची संधी मिळाली. शिष्टमंडळातील एकमेव महिला विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून मी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या अडचणींसह परीक्षा प्रक्रिया, भरती, पारदर्शकता आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित विविध प्रश्न मुख्यमंत्री महोदयांसमोर मांडले. आता या निर्णयांची आणि दिलेल्या आश्वासनांची वेळेत व प्रभावी अंमलबजावणी होणे अपेक्षित आहे. महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थी अनेक वर्षांपासून मेहनत करून स्पर्धा परीक्षांची तयारी करीत आहेत. त्यांच्या मेहनतीला न्याय मिळावा आणि परीक्षा व्यवस्थेवरील विद्यार्थ्यांचा विश्वास अधिक दृढ व्हावा, हीच आमची अपेक्षा आहे. सरकारने दिलेली आश्वासने पूर्ण होतील, असा आम्हाला विश्वास आहे.” असे रेणुकाताई पाटील यांनी सांगितले. उदयनगर (डांगर बुद्रुक), ता. अमळनेर, जि. जळगाव येथून विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून पुढे आलेल्या रेणुकाताई पाटील यांनी बैठकीत जळगाव जिल्ह्यासह महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांच्या प्रश्नांचे प्रतिनिधित्व केले. शिष्टमंडळातील एकमेव महिला प्रतिनिधी म्हणून त्यांनी विद्यार्थ्यांच्या मागण्या मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्या.
‘मुख्यमंत्र्यांच्या सकारात्मक भूमिकेबद्दल आभार’
“विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी घेतलेल्या सकारात्मक भूमिकेबद्दल मुख्यमंत्री महोदयांचे आभार.”
रेणुकाताई पाटील, विद्यार्थी प्रतिनिधी, उदयनगर (डांगर बुद्रुक), ता. अमळनेर, जि. जळगाव

Leave a Reply